दुरुस्ती करण्यास प्रशासन उदासीन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग एसटी बस आगारात एकूण 63 एसटी बसेस असून दीडशेहुन अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. अलिबाग हे तालुक्याचे ठिकाण तसेच जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे बहुतांश शासकीय कार्यालये या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे शाळा-कॉलेज देखील आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह दैनंदिन कामनिमित्त नोकरी व्यवसायानिमित्त एसटीतून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अलिबाग एसटी बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत प्रवाशांतून नाराजीचे सुर उमटू लागले आहेत. स्थानकात मोठंमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचे चित्र आहे.
अलिबाग आगारातून मुरूड, रोहा, पनवेल, कर्जत, पाली, अक्कलकोट, शिर्डी, कल्याण, मुंबई, ठाणे, बोरीवली अशा अनेक मार्गावर एसटी वाहनांची ये-जा असते. तसेच, तालुक्यासह तालुक्याबाहेरील गावांमधूनही एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसह दैनंदिन कामनिमित्त नोकरी व्यवसायानिमित्त एसटीतून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. अलिबाग एसटी बस आगाराला महिन्याला सुमारे 7 लाखहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी अलिबाग आगारातून विना थांबा पनवेल फेरीला प्राधान्य दिले आहे. विना थांबा पनवेल सेवेला प्रवाशांकडून चंगला प्रतिसाद मिळत आहे.एसटी महामंडळाने महिलांसाठी अर्ध तिकीटची योजना सुरु केली आहे. त्यामुळे महिला प्रवासी संख्याही वाढू लागली आहे. एसटीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानादेखील अलिबाग एसटी बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत नाराजी निर्माण होत आहे.
स्थानकात काही ठिकाणी अस्थाव्यस्थ कचरा पडलेला असतो. याठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने प्रवासी सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्याचबरोबर स्थानकात एसटी बससाठी तासनतास प्रवाशांना वाट पहावी लागत आहे. हे प्रश्न असताना स्थानकातील खड्ड्यांचा प्रश्नही गंभीर होऊ लागला आहे. याठिकाणी काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून काँक्रीटीकरण करण्यात आले होते. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून स्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचे चित्र आहे.
पत्र देऊनही दुरुस्तीसाठी दुर्लक्ष
खड्डे दुरुस्तीसाठी अलिबाग एसटी बस आगारातून अनेक वेळा विभाग कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले आहे. मात्र, या पत्रांची पुर्तता करण्यास विभाग नियंत्रक कार्यालय उदासीन ठरले आहे. स्थानकातील खड्डे दुरुस्तीसाठी पत्र देऊनही विभागीय कार्यालयाकडून दुर्लक्ष होत नसल्याचे समोर आले आहे.
विभाग नियंत्रकांनी लक्ष देण्याची मागणी
रायगड विभाग नियंत्रक दिपक घोडे यांची आठवड्यातून अथवा पंधरा दिवसांतून अलिबाग एसटी बस स्थानकाला भेट असते. तेथील प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्याच्या सुचना त्यांच्याकडून होत असतात. परंतु, स्थानकातील खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष का, असा सवाल जनमानसातून उमटत आहे.