। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये आगामी सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माथेरानकर सज्ज झाले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर हॉटेलधारक आणि लॉज व्यावसायिक त्याचबरोबर छोटे-मोठे दुकानदार सुद्धा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ असणारे व सर्वांच्या पसंतीला उतरणारे माथेरान हे सुंदर पर्यटनस्थळ पर्यटकांची आतुरतेने वाट पहात आहे. माथेरानमधील निसर्ग सर्वांना खुणावत असून येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येणार्या पर्यटकांच्या सेवेसाठी माथेरानकर सज्ज झाले आहेत. तसेच, नेरळ-माथेरान मिनिट्रेनच्या नियमितपणे दोन फेर्या होत आहेत. त्याचबरोबर खासगी वाहनाने आल्यास दस्तुरी नाक्यावरून शहरात येण्यासाठी ई-रिक्षा, घोडे व अमन लॉज रेल्वे स्थानकापासून मिनिट्रेनची शटल सेवा देखील उपलब्ध आहे. दिवाळी, नाताळ नंतरच्या एप्रिल आणि मे महिन्यातील सुट्ट्यांमध्ये येथील निसर्गाशी एकरूप होण्यासाठी तसेच अद्भूत निसर्ग पाहण्यासाठी माथेरान पर्यटकांना साद घालत आहे.
दरम्यान, मागील महिन्यात पर्यटकांच्या फसवणूकी बाबतीत माथेरान बंदचे आंदोलन पुकारण्यात आले होते. परंतु, त्याचवेळी दुसर्या दिवशी सर्व व्यवहार सुरळीतपणे पूर्ववत करण्यात आले आहेत. तरीदेखील माथेरान बंद असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे या अफवांना बळी न पडता माथेरानमध्ये येऊन सुट्ट्यांचा मनमुराद आस्वाद घ्यावा, असे आवाहन माथेरानकरांकडून होत आहे.