| रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील धाटाव गावात गुढीपाडव्यानिमित्त मराठी नवीन वर्षाची सुरुवातच गावातील तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देत झाली. या प्रकारात विटा, दगडांचा वापर करून त्या तरुणाला डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने अक्षरशः रक्तबंबाळ केले असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकारामुळे धाटावमधील वातावरण भीतीदायक झाले असल्याचे पहावयास मिळाले.
रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धाटाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ मंगळवार, (दि. 9) एप्रिल रोजी रात्री 9.45 वाजता फिर्यादी दीपक दगडू पवार (36) रा. धाटाव याला मागील भांडणाचा मनात राग धरून आरोपी निलेश भोकटे, अजय मोरे, राहुल रटाटे, सागर जाधव, विकी खैरे, पियुष अंबिस्ते, दिनेश रटाटे व मोन्या जाधव सर्वजण रा. धाटाव यांनी फिर्यादी यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत रोहा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास रोहा पोलीस निरीक्षक डी.बी. मुपडे यांच्या मार्गर्शनाखाली अशितोष म्हात्रे यांसह सहकारी करीत आहेत.