विजय वाघमारे यांचे आवाहन
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
कोरोना साथीमुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात देशातील सर्व उद्योग -व्यवसाय बंद पडले होते. केवळ शेती हा एकमेव व्यवसाय सुरु होता. त्यामुळे शेती व शेती पूरक उद्योगाशी निगडीत व्यवसाय यांना कोकणातील तरुणांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी अधिकारी विजय वाघमारे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मळगांव दत्तमंदिर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उपस्थित शेतकर्यांना शेती तज्ञ व कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मळगांव सरपंच सौ. स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रा.प. सदस्य आनंद नेवगी, सौ. निकिता बुगडे, शेती तज्ञ चेतन प्रभू, कृषी सहाय्यक मळगांव छाया मेस्त्री, कृषी सहाय्यक कुडाळ सचिन चोरगे, तळवडे कृषी अधिकारी यशवंत गवाणे तसेच पंचम खेमराज महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक गणपत शिरोडकर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
या मेळाव्यात उपस्थित कृषी अधिकारी व तज्ञांनी ’आंबा व काजू मोहर संरक्षण मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण ’या विषयासहित ’माती परिक्षण व शेती व्यवस्थापन ’ या विषयांबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी आपले शेती विषयक प्रश्न मांडून कृषी अधिकारी व तज्ञांकडून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. यावेळी चेतन प्रभू यांनी ज्या प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात माती परीक्षण व शेती व्यवस्थापन केले जाते तसे व्यवस्थापन येथील शेतकरी बांधवांनी कसे करावे, शेती मालाची विक्री कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शेतीतज्ञ सचिन चोरगे यांनी आपले मत मांडताना येणारा काळ हा शेतकरी बांधवांचा असेल असा विश्वास व्यक्त करुन याबाबत शासनाने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. विजय वाघमारे यांनी शेती व फळझाडे यांना किड व रोग लागू नयेत यासाठी साफसफाई व फवारणी आवश्यक असल्याचे सांगितले. यशवंत गवाणे यांनी शेतकर्यांनी स्मार्ट फोनचा वापर करुन शेती विषयक आधुनिक ज्ञान प्राप्त करावे, जमिनीचे आरोग्य जपावे, जेसीबी चा वापर टाळावा, तरुणांनी नोकरीच्या शोधात शहरात न पळता शेतीकडे वळावे असे आवाहन केले.
या मेळाव्याचे प्रास्ताविक गणपत शिरोडकर स्वागत उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय पाटील व आभार प्रदर्शन आनंद देवळी यांनी केले.







