। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव शहरात कचेरी रोड मार्गावर शनिवारी (दि.12) मध्यरात्री 12:10 वाजण्याच्या सुमारास काळया रंगाच्या मोटार सायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी सोनी मेडिकलचे दुकान बंद करून चालत येणार्या तरुणावर पिस्तुलची नळी फायर करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर हे दोघे अज्ञात इसम मोटार सायकलवरून मुंबई-गोवा महामार्गाने इंदापूर बाजूकडे पळून गेले. यामध्ये हा तरुण जखमी झाला असून, त्याला औषधोपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. या घटनेची फिर्याद दिपक यादव (वय -24) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर घटनेने माणगाव शहरासह सबंध रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती समजताच रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.
या घटनेतील फिर्यादी दिपक यादव व जखमी तरुण शुभम जैस्वाल हे सोनी मेडिकल दुकान बंद करून कचेरी रोड येथून घरी पायी चालत जात होते. यावेळी शारदा स्वीट मार्टच्या समोर त्यांच्या समोरून काळया रंगाची पल्सर मोटार सायकलवर दोन अज्ञात इसम आले. त्यांनी इंदापुरला जाणारा रस्ता कोठे आहे, असे शुभमला विचारले. शुभम त्यांना रस्ता सांगत असताना मोटार सायकलच्या पाठीमागे बसलेल्या अज्ञात इसमाने त्याच्या जवळील पिस्तुलची नळी शुभम यांच्या पोटाच्या उजव्या बाजूस धरून त्याला ठार मारण्याचा उद्देशाने फायर केली. तसेच मुंबई – गोवा महामार्गाने इंदापूर बाजूकडे पळून गेले.
या घटनेचे कारण समजले नसून माणगाव पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे व पोलीस निरीक्षक माणगाव आर.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बेग अधिक तपास करीत आहेत.
