। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील चेतक इंटरप्रयझेसच्या कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच ते सहा अज्ञात कार्यकर्त्यांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना बुधवारी घडली. या घटनेची फिर्याद चेतक इंटर प्रायझेसचे सुरक्षा रक्षक रमेश लक्ष्मण शेलार यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. चेतक इंटरप्रयझेस लिमिटेड सबलेट सन्नी इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कॅम्प कार्यालयामध्ये मनसे पक्षाचे 5 ते 6 कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश करून गैरकायद्याची मंडळी जमवून मोठमोठ्याने घोषणा देऊन रस्ता लवकरात लवकर करा असे ओरडुन फिर्यादी यांची वरिष्ठांची मीटिंग चालू असताना त्यांना कार्यालयाच्या बाहेर सांगून सर्वजण बाहेर गेल्यानंतर कार्यालयामध्ये आरडाओरडा करून चार ते पाच खुर्च्यांची तोडफोड करून निघून गेले. याप्रकरणी मनसेच्या अज्ञात आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव पोंदकुळे व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.