अलिबागमध्ये पुन्हा चोरी; पोलिसांसमोर भुरट्या चोरट्यांचे आवाहन


| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनाथ येथील घरात व पिंपळभाट जवळील एका शोरुममध्ये चार दिवसात दोन घरफोड्या झाल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. भुरट्या चोरट्यांनी अलिबाग पोलिसांना खुले आव्हान करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. अलिबाग पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक संजय पाटील याकडे गांभीर्याने लक्ष देतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रामनाथ येथील प्रिती शिंदे यांच्या घरातील रविवारी (दि. 4) सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत चोरट्याने घरात घुसून घरातील आयफोन, एटीएम कार्ड व रोख रक्कम असा एकूण 7 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज चोरला. त्यानंतर पिंपळभाट जवळील दशमेश होन्डा या दुचाकी शोरुममधील मागील लोखंडी खिडकीची ग्रील उपकून चोरट्याने 5 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल बुधवारी (दि. 7) पहाटेच्या सुमारास लंपास केला. त्यामध्ये तेथील काही वस्तूंचे नुकसान केले.

चार दिवसामध्ये दोन ठिकाणी झालेल्या चोरी, घरफोडीमध्ये 7 लाख 82 हजार 930 रुपयांचा ऐवज चोरण्यात आला आहे. या चोरीमुळे अलिबाग परिसरातील नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भुरट्या चोरट्याने डोकेवर काढण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे या चोरट्यांना पोलीस पकडण्यास यशस्वी ठरतील का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version