| कळंबोली | प्रतिनिधी |
कळंबोली नोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरांनी उच्छाद मांडला असून, चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चोरट्यांनी आता शैक्षणिक संस्थांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, कळंबोली येथील नामांकित दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या एसीचे कॉपर पाईप 6 मे रोजी पहाटे चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या (के.एल 1, सेक्टर-5ई) बाहेर लावण्यात आलेल्या एसी युनिटचे महागडे कॉपर पाईप अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कापून नेले. इन्स्टिट्यूट चालकाला सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. यामुळे इन्स्टिट्यूटचे आर्थिक नुकसान झाले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही व्यत्यय निर्माण झाला आहे. शिक्षण संस्था आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कळंबोली परिसरात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका हळदी समारंभात महिलेचे 18 तोळ्यांचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता एसी पाईप चोरीच्या प्रकारामुळे व्यापारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तांब्याच्या वाढत्या किमतींमुळे चोरटे आता अशा सुट्या भागांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तातडीने या चोरांचा बंदोबस्त करावा आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक करत आहेत.
कळंबोलीतील दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये चोरी
