| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील जामा मस्जिदमध्ये शिरून तेथील चंदा पेटी चोरी केल्याची घटना गुरुवारी (दि.12) घडली असून चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अलिबाग शहरातील मुख्य बाजारपेठेत मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या मस्जिदमध्ये ही घटना घडली. तसेच रहदारीच्या ठिकाणी असूनही चोरटयाने आत शिरून तेथे असलेली चंदा पेटी (दान पेटी) उचलून पोबारा केल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये निळ्या रंगाचे टी-शर्ट असलेला चोरटा मोठ्या पिशवीमध्ये चंदा पेटी घेवून बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. या मस्जिदपासून अलिबाग पोलिस ठाणे तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय काहीच अंतरावर असून लवकरात लवकर चोरट्याला पकडण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.