पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू
| उरण | वार्ताहर |
मोरा सागरी पोलीस ठाण्याजवळील श्री साई दरबार या मंदिरात शुक्रवारी (दि.18) रात्रीच्या अंधारात चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी मंदिरातील एक मूर्ती तसेच दानपेटीतील पैसे लंपास केल्याच प्रथमदर्शनी तपासात समोर येत आहे.
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उरण मोरा येथील साई दरबार मंदिरात शुक्रवारी (दि.19) रात्रीच्या अंधारात चोरीची घटना घडली असल्याचे पहाटेच्या सुमारास साईभक्तांच्या निदर्शनास आले. या घटनेचे गांभीर्य ओळखून मोरा बंदरातील भाविकांनी मोरा सागरी पोलीस ठाण्याला सदर घटनेची माहिती दिली. मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक इंगोले यांनी तात्काळ ठसे तज्ज्ञांना पाचारण करून चोरीसंदर्भात माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. प्रथमदर्शनी तपासात मंदिरातील एक लहान धातूची मूर्ती तसेच दानपेटीतील पैसे चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा चोरट्यांचा शोध घेत आहेत.
मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या श्री साई दरबार या मंदिरात चोरीची घटना घडल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उरण शहरातील श्री शनी, हनुमान मंदिरातही याअगोदर चोरट्यांनी दानपेटीतील पैसे लंपास केल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील मंदिरे सुरक्षित आहेत का, असा सवाल जनमानसातून व्यक्त केला जात आहे. या चोरीच्या घटनेसंदर्भात लवकरात लवकर चोरट्यांना जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी भाविक व्यक्त करीत आहेत.