चोरीच्या मालसह दोन महिला ताब्यात
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे एसटी बस स्थानकातून काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका महिला प्रवाशाच्या सोन्याच्या दागिन्यांचा डब्याच्या चोरीचा छडा लावण्यात नागोठणे पोलिसांना यश आले आहे. या चोरी प्रकरणी नागोठणे पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा बहुतांश मुद्देमाल परत मिळविण्याची दमदार कामगिरी केली आहे.
यासंदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाच्या नागोठणे एसटी बस स्थानकातून इतरत्र प्रवास करण्यासाठी थांबलेल्या स्नेहल गोंधळी या नागोठणे बस स्थानकावर असताना त्यांच्या पर्स मधील सोन्याच्या दागिन्याचा डबा अज्ञात चोरांनी चोरून नेला होता. सदर चोरीबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, शाखा रायगड यांनी दोन महिला आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक तोळा सोन्याची रिकवरी यापूर्वी प्राप्त केली होती.
गुन्ह्यात नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील व त्यांचे टीमने दोन महिला आरोपी रेखा संतोष टंकाई आणि साक्षी अरुण बंतू यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्यातील चोरी केलेले दागिने नांदेड येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात विक्री केल्याचे सांगितले. नंतर पोलिसांच्या टीमने नांदेड येथे जाऊन अधिकचा तपास केला असता, त्यांनी सदरचे दागिने नक्षत्र ज्वेलर्स गांधीनगर, तालुका व जिल्हा नांदेड येथील ज्वेलर्स दुकान मालक सोमेश वसंतराव राजूरकर यांच्याकडे मुलाचे उपचाराकरिता पैशांची गरज असल्याने विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर नक्षत्र ज्वेलर्सचे मालक सोमेश राजूरकर यांचा सविस्तर जबाब नोंद करून त्यांनी पोलीस टीमच्या समक्ष हजर केलेले साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले. सदर गुन्ह्यात एकूण 7.9 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते त्यापैकी 6.5 तोळे सोने परत मिळविण्यात नागोठणे पोलिसांना यश आले आहे. नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील, चंद्रशेखर नागावकर, मयुरी पाटील, वृषाली मांटे यांचा समावेश होता.







