| पनवेल | वार्ताहर |
कस्टम ड्युटी चुकवून जेएनपीटी बंदरात आयात करण्यात आलेली व कस्टम विभागाने पुढील कारवाईसाठी ताब्यात घेऊन पनवेलच्या शिरढोण येथील गोदामामध्ये ठेवलेली तब्बल 16 कोटी सहा लाख रुपये किमतीची सुपारी व मिरी या मालाची गोदामाच्या चालकमालकांनीच चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी कस्टम विभागाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
2022 मध्ये अल्फा इंडस्ट्रीज, हायलॅन्ड इंटरनॅशनल आणि फ्युचर फस्ट इंटरनॅशनल या तीन कंपन्यांनी परदेशातून कस्टम ड्युटी चुकवून कोट्यवधी रुपये किंमतीची सुपारी व मिरी या मालाची आयात केली होती. डिसेंबर 2022 मध्ये जेएनपीटी बंदरात हा माल आल्यानंतर कस्टम ड्युटी भरली न गेल्यामुळे कस्टम विभागाने या तिन्ही कंपन्यांचा माल जप्त करून पनवेलच्या शिरढोण येथील आशेरा वेअरहाऊस अँड पार्कमधील वेगवेगळ्या गाळ्यांमध्ये ठेवला होता. मात्र, या मालाची चोरी होत असल्याची माहिती ‘डायरोक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स’ (डीआरआय) च्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यामुळे डिसेंबर 2022मध्ये कस्टमच्या अधिकार्यांनी या गाळ्यामध्ये जाऊन मालाची तपासणी केली असता, तेथे अल्फा इंडस्ट्रीज या कंपनीची सहा कोटी 33 लाख रुपये किमतीची 128 मेट्रिक टन मिरी चोरून नेण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे कस्टम विभागाने हा माल सील करून त्याच ठिकाणी ऑलसन शिपिंग अँड लॉजिस्टिक्सच्या गळ्यामध्ये ठेवला होता.
याच गाळ्यामध्ये ठेवण्यात आलेला अन्य कंपन्यांचा मालही चोरून नेण्यात येत असल्याची माहिती ऑगस्ट 2023मध्ये डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे कस्टम विभाग, डीआरआय व सीआययू आणि ऑडिट सेक्शन विभागाच्या अधिकार्यांनी संपूर्ण मालाची तपासणी केली. यावेळी भिंतीला भगदाड पाडून त्यातून मालाची चोरी केल्याचे आल्याचे आढळले. कस्टम विभागाने या मालाच्या चोरीबाबत अधिक तपास केला असता, त्यांना अधिक तपासात तेथील काही व्यक्तींनी संगनमत करून कस्टमच्या ताब्यात असलेल्या 16 कोटी 6 लाख किमतीची सुपारी व मिरी चोरून नेल्याचे आढळून आले आहे.
16 कोटींच्या सुपारी व मिरीची चोरी
