कामोठ्यात दागिन्याची चोरी


| पनवेल । वार्ताहर ।
चैन स्नॅचींग करणाऱया लुटारुंनी पोलीस पत्नी असलेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील तब्बल 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना कामोठे सेक्टर-36 मध्ये बुधवारी सकाळी घडली. कामोठे पोलिसांनी या प्ररकरणी दोघा अज्ञात लुटारु विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

या घटनेतील तक्रारदार या कामोठे सेक्टर-35 मध्ये राहण्यास असून त्या मुबंईत बीएमसीच्या शाळेत शिक्षिका आहेत. तर त्यांचे पती हे मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. या शिक्षिका रोज सकाळी आपल्या पतीसह मॉर्निंग वॉकसाठी जात असतात. बुधवारी सकाळी 6 वाजता त्या आपल्या पतीसह नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्या सेक्टर-36 मधील भुमी टॉवर इमारतीजवळ आल्या असताना, समोरुन एक स्कुल बस आल्याने त्या बाजुला उभ्या राहिल्या.

याचवेळी त्यांच्या समोरुन विरुद्ध दिशेने मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने या शिक्षिकेच्या गळ्यावर जोरात हात मारुन त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व 1 लाख रुपये किंतमीची सोन्याची चैन खेचुन शिवसेना चौकाच्या दिशेने पळून गेले. यावेळी शिक्षिकेने आरडा-ओरड केली. मात्र तोपर्यंत सदर लुटारु पसार झाले. त्यामुळे या शिक्षिकेने पतीसह कामोठे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

Exit mobile version