रोहा तालुक्यातील गौण खनिजाची चोरी

माती चोरांना अभय कोणाचे?
। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील चणेरा विभाग माती, रेती, दगड, मुरूम या गौण खनिजासाठी प्रसिद्ध असल्याने तालुक्यातील सर्वाधिक वीट भट्ट्या तसेच सक्शन पंप या विभागात कार्यरत आहेत. अर्थातच या उद्योगांना स्थानिक नेतृत्वाचे छुपे पाठबळ असल्याची देखील चर्चा आहे. यामुळे दिवसाढवळ्या गौण खनिजाची चोरी करणार्‍या या महाभागाना स्थानिक पुढार्‍यांसह महसूल विभागाचे देखील अभय आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

चणेरा विभागातील वीट भट्टी व्यावसायिकांनी आपापल्या भट्ट्यांवर मातीचे ढिगारे उभे केले असून सोबतच लाखो तयार विटांच्या भट्ट्या देखील या विभागात फेरफटका मारताना सहज दिसून येतात. पण महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांना मात्र या गोष्टी दिसत नसल्याने जेमतेम 100/200 ब्रास मातीची रॉयल्टी भरून घेतली की आपले कर्तव्य संपले अशा अविर्भावात ही मंडळी काम करत आहेत.याच विभागातील तळवडे गावातील एका महिलेच्या शेतातील माती वीटभट्टी व्यावसायिकाने जागा मालकांची तसेच महसूल खात्याची परवानगी न घेता काढून नेली. या गोष्टीला 15 दिवस झाले पण पोलीस प्रशासनाकडून अद्याप संबंधितांवर चोरीचा गुन्हा दाखल नाही तसेच महसूल विभागाकडून माती रॉयल्टी चुकविल्याबद्दल नोटीस देखील नाही. रविवारी रात्री गोफण बंदरात एक रेतीचा ट्रक पोलिसांनी पकडला. स्थानिक पोलीस पाटलांच्या ताब्यात सदर ट्रक जमा केला असता सदर ट्रक दमदाटी करून बंदरातून नेण्यात आला. सदर प्रकरणात देखील कोणताही गुन्हा अद्याप दाखल नाही.
एकंदरीत रोहा तालुक्यात कोणीही यावे माती, रेती, दगड असे कोणतेही गौण खनिज काढून न्यावे असा प्रकार सुरू आहे. यामुळे रोहा तालुक्यातील गौण खनिज उत्खनन करणार्‍यांना स्थानिक पुढार्‍यांसह महसूल विभागाचेच अभय तर नाही ना अशी चर्चा होत आहे.

Exit mobile version