.. मग मुख्यमंत्र्यांची निवडही थेट जनतेमधूनच करा; अजित पवारांची टिप्पणी

। मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्यात नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला सोमवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला. यावेळी अजित पवार यांनी विरोधकांची बाजू भक्कमपणे मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. पुढे असही ते म्हणाले की, नगराध्यक्ष जनतेमधून निवडत असाल तर मग मुख्यमंत्र्यांची निवडही थेट जनतेमधूनच करा.

हे विधेयक लोकशाहीसाठी घातक आहे. एकतर हे विधेयक मागे घ्या किंवा ते संयुक्त समितीकडे पाठवा. नगरपरिषदेच्या निवडणुका थेट राजकीय पक्षाच्या चिन्हावर होतात. काही गुंड प्रवृत्तीचे लोकही समाजात आहेत, थेट निवडीमुळे असे लोक निवडून येतील आणि चुकीचा पायंडा पडेल. हे विधेयक मागे घ्या किंवा संयुक्त समितीकडे पाठवा, त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, असे अजित पवार यांनी म्हटले.

तुमच्या हातात ज्या गोष्टी आहे, तिथे तुम्ही वेगळ्या गोष्टी करता. सुरुवातीला आपण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. त्यानंतर तुमच्या मनात काय आलं माहिती नाही. तुम्ही २० लोकांना घेऊन गेलात, मग आणखी २० लोक तुम्हाला येऊन मिळाली. ४० लोकं मिळाल्यानंतर तुम्ही त्यांना कमी केले. हे असं तुम्हाला का करता आलं? कारण मुख्यमंत्री आमदारांकडून निवडला जातो. आता तुम्ही जो निर्णय घेत आहात, त्यामुळे असे होणार नाही. जर दुसऱ्या कोणाला ‘एकनाथ शिंदे’ व्हायचे असेल तर त्यांना ते साध्य करता येणार नाही. त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होईल. त्यामुळे या विधेयकात बदल केला तर बरे होईल, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली.

Exit mobile version