जिल्ह्यात 43 पोलीस अधिकार्‍यांची पदे रिक्त

| अलिबाग | भारत रांजणकर |
रायगड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध पोलिस यंत्रणेला अक्षरशः कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात मंजूर पदांपैकी पोलीस अधिकार्‍यांची तब्बल 43 पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात दिवसाला 7 ते 10 गुन्ह्यांची नोंद होत आहे. मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. औद्योगिकीकरणातही जिल्हा अग्रेसर आहे. यामुळे नागरीकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील 27 पोलीस ठाण्यांमध्ये दिवसाला 7 ते 10 गुन्ह्यांची नोंद होत आहे. मात्र अधिकार्‍यांच्या कमतरतेमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र विभागासाठी पोलीस अधिक्षक ते पोलीस उपनिरिक्षकांची एकूण 191 पदे मंजूर आहेत. मात्र यामधील 43 पदे रिक्त आहेत. ही पदे भरावीत यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून राज्य सराकरकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

अधिकारी कमी मात्र 90.6 टक्के गुन्ह्यांची उकल
एकीकडे अधिकार्‍यांच्या कमतरतेमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी, लागत असतानाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस दलाने बाजी मारली आहे. 2022 या वर्षात दाखल झालेल्या 2 हजार 254 गुन्ह्यांपैकी 2 हजार 31 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण 90.6 टक्के इतके आहे.

457 कर्मचार्‍यांची पदे रिक्त
रायगड जिल्हा पोलीस दलात 43 पोलीस अधिकार्‍यांव्यतिरिक्त 457 पोलीस कर्मचार्‍यांची पदेही रिक्त आहेत. 2 हजार 411 पोलीस कर्मचार्‍यांची पदे मंजूर असून, त्यामध्ये 1 हजार 954 पदे भरण्यात आली आहेत. रिक्त पोलीस कर्मचार्‍यांमध्ये सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल यासह इतर पदांचा समावेश आहे.

पोलीस दल रिक्त अधिकारी
पद – मंजूर पदे – भरलेली पदे – रिक्त पदे
पोलीस अधिक्षक – 1 – 1 – 0
अप्पर पोलीस अधिक्षक – 1 – 1 – 0
पोलीस उपविभागीय अधिकारी – 9 – 9 – 0
पोलीस निरिक्षक – 29 – 28 – 1
सहाय्यक पोलीस निरिक्षक – 41 – 38 – 3
पोलीस उपनिरिक्षक – 110 – 71 – 39

Exit mobile version