तीन वर्षांपासून आदर्श पुरस्कार वितरण नाही
| रायगड | प्रमोद जाधव |
शिक्षक दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. परंतु, गेल्या अनेक वर्षांच्या या परंपरेला प्रशासकीय राजवटीत ब्रेक लागला आहे. तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासनाद्वारे कारभार सुरू आहे. प्रशासनामार्फत फक्त पुरस्कार जाहीर केले जात आहेत. मात्र, पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम घेतला जात नाही, अशी परिस्थिती आहे.
रायगड जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक शाळा असून, त्यात दोन हजार 501 जिल्हा परिषद शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजार 888 शिक्षक असून, 87 हजार 92 विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करतात. शासनाच्या वेगवेगळ्या शैक्षणिक व अशैक्षणिक योजनांचे काम शिक्षक करतात. डिजिटल शिक्षण देण्याबरोबरच खेळता खेळता शिक्षण यावरही अनेक शिक्षक भर देत आहेत.
आदर्शवत काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन जिल्हा परिषदेमार्फत गौरव केला जातो. या पुरस्कारामुळे शिक्षकांना एक प्रेरणा मिळते. हा पुरस्कार म्हणजे आदर्शवत शिक्षकांसाठी नवी ऊर्जा देणारे आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून पाच सप्टेंबरला दरवर्षी साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्ह्यातील आदर्शवत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केला जातो. सन्मानपत्र देऊन हा गौरव केला जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या पुरस्काराचे महत्त्व वाढले आहे. रायगड जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु, या पुरस्कार वितरणाला ब्रेक लागला आहे.
राजकीय राजवट संपून जिल्हा परिषदेवर 21 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रशासनामार्फत जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जात आहे. तरीदेखील गेल्या तीन वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रशासन राबवू शकले नाही. पाच सप्टेंबरपूर्वी आदर्श शिक्षकांची यादी जाहीर केली जाते. परंतु, त्यांचा प्रत्यक्ष सन्मान करण्यास जिल्हा परिषद प्रशासन उदासीन ठरल्याची चर्चा जोरात सुरु आहे. मागील तीन वर्षांपासून 90 हून अधिक शिक्षकांना अद्याप पुरस्कार मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या परंपरेला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. यावर्षीदेखील प्राथमिक विभागाच्या आदर्श शिक्षकांची यादी गुरुवारी (दि.4) जाहीर करण्यात आली. याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 2025-2026 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हाभरातील 17 शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील मनोहर पाटील यांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, पेण तालुका किशोर पाटील, पनवेल तालुका योगिनी वैदू, कर्जत संज्योती कांबरी, खालापूर तालुका किर्ती धारणे, उरण तालुका अजित जोशी, सुधागड तालुका वृषाली गुरव, रोहा तालुका प्रसाद साळवी, महाड तालुका वसंत साळुंखे, श्रीवर्धन तालुका सीमा चव्हाण व नारायण खोपटकर, म्हसळा तालुका शशिकांत भिंगारदेव, पोलादपूर तालुका विजय पवार, माणगाव सुजाता मालोरे व परेश अंधेरे, तळा तालुका उल्का मोडकर, मुरुड तालुका हेमकांत गोयजी यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने हा पुरस्कार वितरण सोहळा लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसल्याने यादी जाहीर केली नाही. परंतु, यादी तयार आहे. कार्यक्रम घेतल्यास आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरण केले जाईल.
महारुद्र नाले,
शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, रायगड
