द्रोणागिरी पर्वतावर दरड कोसळली

डाऊरनगर परिसरातील नागरिकांच्या जीवितेला धोका

| उरण | वार्ताहर |

सतत पडणारे पावसाचे पाणी यामुळे द्रोणागिरी डोंगर खचले असून बुधवारी (दि.19) सकाळी 11 वाजता डाऊरनगर येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड नागरिकांच्या घराजवळ कोसळली. सुदैवाने यात कोणतेही जिवितहानी झाली नाही मात्र डाउरनगर येथे माळीण किंवा इर्शाळवाडी सारखी दरड कोसळून घातपात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे डाउरनगर येथील नागरिकांच्या जिविताला भविष्यात खूप मोठा घोका निर्माण होणार आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन डाउरनगर परिसरात राहणा-या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन तिथे संरक्षक जाळी बसवावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, चाणजे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अमित भगत, उपसरपंच सोनाली ठाकूर यांनी सदर घटनेची पाहणी केली आहे.



दरड कोसळल्याने लगेच कामगारांना बोलावून दरड कोसळलेल्या ठिकाणी जाऊन माती, दगड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सतत सारखा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कामे करण्यात अडथळा येत आहेत. जेसीबी लावून काम करता येत नाहीत. तसेच ऐन वेळी काम करण्यासाठी वेळेवर माणसे मिळत नाहीत.तरी 8 ते 10 माणसे सदर ठिकाणी कामाला आहेत. चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत कोणतेही अनुचित घटना, दुर्घटना घडू नये यासाठी ग्रामपंचायत तर्फे विशेष काळजी घेण्यात येत आहे.अशी माहिती चाणजे सरपंच -अमित भगत यांनी दिली. सतत पडणाऱ्या पावसामुळे, वादळवारामुळे, आमच्या घरात पावसाचे, नाल्याचे पाणी घुसून घरातील मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र झालेले नुकसान बघण्यासाठी शासनाचे कोणतेही प्रतिनिधी किंवा अधिकारी येथे आले नाहीत. आमच्या जागेची पाहणी करून शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. अशी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत,अशी मागणी -ऋषिकेश ठाकूर यानी केली आहे.

डाऊरनगर येथे दरड कोसळल्याची घटना समजताच आमची आपात्कालीन यंत्रणा लगेच तिथे दाखल झाली आहे. तलाठी, ग्रामसेवक हे घटना स्थळी जाऊन तेथील पाहणी करून आले आहेत. नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना देखील दिलेल्या आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी दगड, माती काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. नागरिकांना सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जात आहेत.

उद्धव कदम, तहसीलदार, उरण
Exit mobile version