बचत गटांकडील फराळाची मागणी; ऑर्डर देऊन विकत घेण्याकडे कल
| पनवेल | प्रतिनिधी |
दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून दिवाळीमध्ये फराळाला अनन्य साधारण महत्व असते. सध्याच्या महागाईच्या काळामध्ये देखील घरगुती फराळाला सुगीचे दिवस आले असून मोठ्या प्रमाणात या फराळाकडे ग्राहकांची वाढती मागणी दिसून येत आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच दिवाळीचा फराळ बनवायला मिळत नाही. त्यामुळे काही जण फराळ बाहेरून विकत घेतात. परंतु, दुकानातून विकत घेतलेला फराळ चविष्ठ असेलच असे नाही, किंवा कधी कधी त्याचा दर्जा देखील खालावलेला असतो. त्यामुळे दुकानात ठेवलेला फराळ विकत घेण्यापेक्षा ऑर्डर देऊन घरगुती फराळ विकत घेण्याकडे अनेकांनाचा कल असतो. उत्तम दर्जा आणि चव या दोन्ही गोष्टींची हमी असल्यामुळे महिला बचत गटांकडील फराळाची मागणी वाढली आहे.
दिवाळीच्या दरम्यान घरगुती फराळाची लाखोंची उलाढाल होते. पनवेलमध्ये तळागळातल्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू झालेल्या बचतगटाच्या चळवळी बरोबरच घरगुती व्यवसाय म्हणून आता वटवृक्ष झाला आहे. पनवेल शहरी भागात तयार फराळाला मोठ्या प्रमाणात मागणी असून ग्रामीण भागात अजूनही घरीच फराळ बनवण्याकडे कल दिसून येत आहे. दिवाळी म्हटली की, लाडू, करंजी, खमंग चिवडा अशा नानाविविध पदार्थ बनविण्याची लगबग घराघरात सुरू होते. मात्र, अलीकडे धकाधकीच्या जीवनात फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नसल्याने तयार फराळालाही चांगली मागणी वाढली आहे. काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने बाजारपेठेत स्वीट मार्ट, किराणा व्यवसायिक, घरगुती पदार्थ बनविणारे उत्पादक यांनी आपल्या ग्राहकांना विविध फराळाचे पदार्थ देण्यासाठी आगाऊ बुकींग सुरू केली आहे. दरवर्षीच्या तुलनेत सुकामेवाच्या किमतीत वाढ झाली असून त्याचा परिणाम फराळाच्या किमतीवर झाला आहे. तरीही दिवाळी म्हटले की, किंमतीपेक्षा जीभेचे लाड पुरविण्याकडे अधिकचे लक्ष दिले जाते.
फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी धडपड
शाळेतील मुलांना लवकरच सुट्ट्या लागणार आहेत. प्रत्येकाची आपल्या मामाच्या गावी तथा मुळ गावी जाण्याकडे धडपड सुरू आहे. त्यातच फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी किराणासह अन्य वस्तु घरामध्ये येत आहेत. त्यात भडंग मुरमुरे, शेंगदाणा, रवा, दालव, मका पोहे, मैदा, रवा, बॉम्बे बेसण, हरभरा पीठ, दालडा, गावरान तूप, फरसान यासोबतच मिठाई, गिफ्ट पॅक, चिवडा बनविण्याचा तयार मसाला याकडे ग्राहकांचा अधिक ओढा आहे. दरवर्षी साधारणतः 2 ते 3 हजारांमध्ये बसणारे बजेट 4 हजारांवर जाऊन पोहोचले आहे. पालक शेव, लसून शेव, मसाला शेव, चिवडा, खारी बुंदी, चकली भाजणी, खारे शंकरपाळे, लाडू, बूंदी, शंकरपाळे, अनारसे, करंजी, अनारसे पीठ या पदार्थांना ग्राहकांची अधिकची मागणी आहे.







