व्यावसायिक नेत्यांची मांदियाळी
| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान या ठिकाणी अल्प मताधिक्य असल्याने वरिष्ठ पातळीवरील राजकीय पक्षांची नेतेमंडळी येथे कायमच दुर्लक्ष करीत आहे. केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्या पारड्यात हजारो मते मिळतील, या अनुषंगाने येथील कार्यकर्त्यांना गोंजारत असतात. अल्प मतदार संख्या असल्यामुळे मुळात त्यांना या स्थळाचा सर्वांगीण विकास करावयाचा नाही. त्यामुळेच हे सुंदर स्थळ आजही विकासाच्या प्रतीक्षेत दिसत आहे. त्यामुळे माथेरानमध्ये नेहमीच लोकनेत्यांचा दुष्काळ असतो.
अनेक वर्षांपासून माथेरानच्या विकासाच्या प्रगतीचा आलेख खुंटलेला आहे. स्थानिक लोक विविध समस्यांना सामोरे जाताना व्यावसायाभिमुख रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने त्रस्त झाले आहेत. पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी हाडाचा लोकनेता नसल्याने एकप्रकारे या गावाला बेवारसपणा दिसून येत आहे. 2016च्या निवडणुकीनंतरच्या कालखंडात प्रशासक राजवट सुरू झाली. वीज, पाणी, रस्त्यांची वाताहत झाली होती, त्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी येथे लोकनेता नसल्याने लोकांना वाऱ्यावर सोडून दिल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. जो तो स्वतःच्या सोयीनुसार राजकारण करत असून आपल्या व्यवसायात आर्थिक भर कशी पडेल, याकडे पाहिले जात आहे. जी मंडळी आजही आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाली आहेत, त्यांना या गावाबद्दल काहीएक स्वारस्य दिसत नसून आपण कधी एकदा नगरपरिषदेच्या सभागृहात स्थानापन्न होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीनंतर जे पराभूत होतात ते पुढील पाच वर्ष एकप्रकारे गावाशी फारकत घेतल्याप्रमाणे वावरताना दिसतात. तसेच, या पाच वर्षांत सत्ताधारी गावाचा विकास करत आहेत की गावाला अधोगतीला नेत आहेत, याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या व्यवसायात मग्न होत असतात. केवळ निवडणूक काळात येथील नागरिकांना गोंजारले जाते आणि सत्तेत सहभागी असणारी मंडळी सुद्धा निवडणुकीत केलेला खर्च वसूल करण्यात व्यस्त असतात.
‘तळे राखी तो पाणी चाखी’ हे जरी सर्वश्रुत असले तरी सुद्धा लोकांना अभिप्रेत असणारी महत्वपूर्ण कामे मार्गी लावल्यास मतदार सुद्धा त्यांच्या कृष्णकृत्याकडे कानाडोळा करू शकतात. परंतु, दर पाच वर्षांनी या सर्व उमेदवारांचे तेच तेच जाहीरनामे पाहून जनता अक्षरशः कंटाळून गेली आहे. अल्प मतदानामुळे वरिष्ठ नेते मंडळी काही केल्या येथील कामे करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यातच चार वर्षे उशिरा निवडणुका होत असल्याने मतदार राजा व्याजासहित आर्थिक लाभ घेण्यासाठी तत्पर असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी काळात पार पडणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत व्यावसायिक नेत्यांनी गावाच्या विकासासाठी सुद्धा प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. येथील एकूण दहा प्रभागात सर्व मिळून 4 हजारांच्या आसपास मते आहेत. त्यातही काही वर्षांपूर्वी याच राजकीय व्यक्तींनी मताच्या हव्यासापोटी परिसरातून स्थायिक झालेल्या लोकांची मते समाविष्ट केल्यामुळे याचा नाहक त्रास त्यांनाच मतांचा वाढीव मोबदला देताना होणार आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांनंतर होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वारे आतापासूनच घोंगावत असून ज्यांना राजकारणाची व्याख्या काय असते याचे सुतभर ज्ञान नाही, अशीही मंडळी आर्थिक लोभापायी खोटी स्तुती करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दिखाव्याला बळी जाण्याची शक्यता निदान यावेळी नाकारता येत नाही.
