| अलिबाग | वार्ताहर |
लोकशाही, क्रांती, तलवार, मतपेटी या स्त्रीलिंगी शब्दामध्ये मोठी ताकद आहे. त्याचप्रमाणे कविता व गजल या स्त्रीलिंगी शब्दातदेखील फार ताकद असल्याचे प्रतिपादन लेखक, कवी व समीक्षक रोहिदास पोटे यांनी केले.
पेण येथील महात्मा गांधी वाचनालय येथे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र शासन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय रायगड व महात्मा गांधी वाचनालय पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सव-2024 या दोन दिवसीय कार्यक्रमात अखेरच्या दिवशी ‘गजल व कविता एक काव्यानुभव’ या परिसंवादात अध्यक्षस्थानावरून रोहिदास पोटे बोलत होते. एल.बी. पाटील, सुभाष कटकदौंड, विनोद टेंबूलकर, पां.शि. पाटील, वैभव धनावडे, दिलीप मोकल, जीविता पाटील यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. सूत्रसंचलन मोहिनी गोरे यांनी केले.
‘मराठी वृत्तपत्रातील शब्दांचे सामर्थ्य’ या विषयावरील परिसंवादात कांतीलाल कडू, प्रकाश सोनवडेकर, दत्ता म्हात्रे, विजय मांडे, विजय मोकल यांनी आपले विचार व्यक्त केले. वृत्तपत्रात बातमी प्रसारित करताना योग्य शब्दांचा वापर केला पाहिजे, असा सूर या परिसंवादात उमटला. पत्रकारिता करताना विवेकबुद्धीने चालावे लागते, असे प्रतिपादन दत्ता म्हात्रे यांनी व्यक्त केले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी केले.
‘सार्वजनिक ग्रंथालय-एक संस्था’ या विषयावरील परिसंवाद अरविंद गणपत वनगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या परिसंवादात रामदास गायकवाड, तुकाराम पवार, संजय कदम व संजय बोनदारडे यांनी सहभाग नोंदवला. या परिसंवादातून ग्रंथालयीन कामकाजातील महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. ग्रंथालयीन कर्मचारी व संस्थेचे कार्यकारी मंडळ यांच्या समन्वयातून ग्रंथालय या संस्थेची प्रगती होऊ शकते, असे मत सर्व वक्त्यांनी व्यक्त केले. 20 व 21 मार्च असे दोन दिवस ग्रंथोत्सव-2024 साजरा करण्यात आला. यात जिल्ह्यातील वाचकांनी ग्रंथप्रदर्शन व ग्रंथ विक्री दालनास भेट देऊन ग्रंथ खरेदी केले. ग्रंथोत्सव यशस्वीतेसाठी महात्मा गांधी वाचनालय, पेणच्या सर्व कर्मचारी व सदस्यांनी तसेच जिल्हा ग्रंथालयाच्या ममता रोगे यांनी परिश्रम घेतले.
उत्कृष्ट वाचकांचा सत्कार
ग्रंथोत्सव-2024 मध्ये या वर्षी प्रथमच रायगड जिल्ह्यातील तालुका व जिल्हास्तरीय ग्रंथालयातील उत्कृष्ट वाचकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उरण येथील पांडुरंग कोळी (80) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. माँसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालय, नगरपरिषद, उरण या ग्रंथालयाचे ते आजही नियमित वाचक आहेत. या वयातही पंधरा दिवसांनी 5 कि.मी. पायी चालत ग्रंथालयात येऊन ग्रंथ बदलून नेतात.