पोलीस उपविभागीय अधिकारी सविता गर्जे यांचे उद्गार
| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुका विज्ञान प्रदर्शन 2024-25 चे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळा येथे करण्यात आले. याप्रसंगी बोलताना सविता गर्जे यांनी विद्यार्थ्याचे कौतुक करताना सांगितले की, खरंतर म्हसळा हा ग्रामीण आणि डोंगराळ तालुका असून, शहरासारखे मार्गदर्शन आणि प्रयोगासाठी लागणार्या अद्ययावत साहित्य मिळत नाही त्याही परिस्थितीत या तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले नैपुण्य सिद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून, त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे गौरवाने सांगून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविले.
तहसीलदार सचिन खाडे यांनीही विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून यातूनच उद्याचा नामवंत आणि देशाचे नाव उंचावील असा वैज्ञानिक तयार व्हावा, अशी अपेक्षा खाडे यांनी व्यक्त केली. शाळेचे चेअरमन समीर बनकर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, तहसीलदार सचिन खाडे, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, स्कूल चेअरमन समीर बनकर, प्राचार्य डी.आर. पाटील, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर टेकळे, पोलीस उपनिरीक्षक एडवळे, माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष नितीन पाटील, वरिष्ठ विस्तार अधिकारी अ.बा. मोरे, कनिष्ठ विस्तार अधिकारी बशीर उलडे, गटसमन्वयक बिचुकले,दिपक पाटील, विनयकुमार सोनवणेसर्व केंद्र प्रमुख, माध्यमिक, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, गणित -विज्ञान मंडळाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन हनुमंत मोरे यांनी केले. विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाचे एकूण 36, माध्यमिक विभाग 12, उच्च माध्यमिक 1 आणि शिक्षकांमधून एकूण 9 प्रतिकृती मांडल्या होत्या.