बोर्लीपंचतन शहरात बसस्थानकच नाही

एसटीचा कारभार वार्‍यावर
। दिघी । वार्ताहर ।

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटनाला जोडलेली एकमेव मोठी बाजारपेठ, तसेच तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बोर्लीपंचतन शहरात अद्यापही बस स्थानक नाही. त्यामुळे येथे येणार्‍या प्रवशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्‍न येथील ग्रामस्थांना भेडसावत आहे. बोर्लीपंचतन शहरात असणारे बस स्थानक आठ महिन्यांपूर्वी अतिक्रमणमध्ये हटविण्यात आले होते. परिणामी, आता शाळा सुरू होणार आणि शेकडो विद्यार्थी व प्रवासी बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे राहणार असल्याची चिंता पालक वर्गातून होत आहे. मागील कित्येक महिन्यांपासून असलेली बस स्थानकाची मागणी अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे आणखी बस स्थानकासाठी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्‍न येथील नागरीक तथा प्रवासी करीत आहे.


बोर्लीपंचतन शहर श्रीवर्धन तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. दिघी पोर्ट, आदगाव बीच, वेळास व प्रसिॠ दिवेआगर पर्यटनस्थळ ही चारही ठिकाणे बोर्लीपंचतनच्या अवतीभोवती आहे. त्यामुळे बोर्लीपंचतनला विशेष महत्व आहे. दिघी व हरिहरेश्‍वर या दोन्ही तालुक्यातील टोकांतून कोणत्याही वस्तूंच्या खरेदीकरीता बोर्लीपंचतनला आल्याशिवाय पर्याय नाही. येथे ये-जा करणार्‍यांची संख्या मोठी आहे. बस स्थानकावरील गर्दीवरून या शहराचे महत्व कळते. शहराच्या परिसरातील 40 गावांना सुविधा मिळाव्यात, या विचाराने आता तरी बस स्थानक होईल, अशी आशा येथील नागरीक बाळगून आहेत.

ग्रामसभेत ठराव
बोर्लीपंचतन येथील एसटी बस स्थानक पूर्वीच्याच जागेवर उभारण्यात यावे अशी मागणी मंगळवारी ग्रामस्थांनी केली. त्यावेळी ग्रामसभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला. महामंडळ व संबंधित प्रशासनाकडून त्याच जागेचे भूसंपादन करून लवकरात लवकर प्रवशांना बस स्थानकाची सुविधा मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बोर्लीपंचतन येथे मागणीनुसार नव्याने बस स्थानक होण्यासाठी श्रीवर्धन प्रशासनाकडून भूखंड उपलब्ध करून मिळावा, इसक महामंडळाकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

अनघा बारटक्के, नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ रायगड

Exit mobile version