भारताबाबत कोणताही भेदभाव नाही!

क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांची ग्वाही
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जपानला जाणार्‍या भारताच्या ऑलिम्पिक पथकासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधामध्ये कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले. याबाबत औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली असून, लवकरच समस्येकडे लक्ष दिले जाईल, असे रिजिजू यांनी सांगितले.

कोरोनाची साथ अद्याप काही देशांमध्ये तीव्र स्वरूप असल्यामुळे 23 जुलैपासून सुरू होणार्‍या टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारतासह 11 देशांच्या पथकांसाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. भारतीय क्रीडापटू आणि अधिकार्‍यांना जपानला निघण्यापूर्वी दररोज सात दिवस करोना चाचणी आवश्यक आहे. त्यानंतर टोक्योला पोहोचल्यावरही पुढील तीन दिवस अन्य कोणत्याही देशाच्या खेळाडूच्या संपर्कात न येणे, अशा नियमांचा यात समावेश आहे. या धोरणाबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) नाराजी दर्शवली होती.

ऑलिम्पिक धोरणानुसार कोणत्याही देशाशी भेदभाव केला जात नाही. समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जाते. ङ्गआयओएफने ऑलिम्पिक संयोजन समितीकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. भारतीय क्रीडापटूंची तयारी आणि संधीवर परिणाम करणार्‍या कोणत्याही मुद्दयांबाबत आम्ही जोरदार आवाज उठवू,फफ असे रिजिजू यांनी सांगितले. यंदाचे ऑलिम्पिक हे आव्हानात्मक वातावरणात होत आहे. हे आव्हान प्रत्येकापुढील आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सर्वोत्तम पदककमाईची आशा
भारत यंदा सर्वोत्तम पदककमाई करील, असा विश्‍वास रिजिजू यांनी व्यक्त केला. भारताने 2012मध्ये ऑलिम्पिकमधील सर्वाधिक सहा पदके जिंकली होती. भारताला अधिकाधिक पदके मिळावीत, यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. भारताला किती पदके मिळतील, हे एक क्रीडामंत्री म्हणून मला सांगता येणार नाही. आमच्या अपेक्षा मोठया आहेत. यंदाचे ऑलिम्पिक भारतासाठी यशस्वी आणि संस्मरणीय ठरो अशी आशा करूया,फफ असे रिजिजू यांनी सांगितले.

तयारीसाठी 1100 कोटी
ऑलिम्पिकपटूंच्या तयारीसाठी सरकारने गेल्या चार वर्षांत 1100 कोटी रुपये खर्च केला आहे, असे रिजिजू यांनी सांगितले. भारताच्या ऑलिम्पिकपटूंच्या कामगिरीबाबत रिजिजू यांनी समाधान प्रकट केले.

भारतातून निघण्यापूर्वीच्या क्रीडापटूंच्या कोरोना चाचण्यांचा नियम शिथिल करावा, अशी विनंती आयओए ने केली आहे. भारतीय खेळाडूंचा सराव आणि सहभाग सुरक्षित वातावरणात असावा, हाच आमचाही हेतू आहे. आपले खेळाडू कोणत्याही मानसिक तणावाखाली नाही, याची मी हमी देतो.
किरेन रिजिजू, केंद्रीय क्रीडामंत्री

Exit mobile version