शिधाधारकांमध्ये तीव्र नाराजी
| माथेरान | वार्ताहर |
राज्य शासनाने सर्वसामान्य शिधाधारकांचे गणपती आणि ईद हे सण आनंदात जावे यासाठी आनंदाचा शिधा वितरणास दिला. पण, हा शिधा गणेशोत्सवाच्या सुरुवातीला न मिळता तो दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर दिला गेल्याने शिधाधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. माथेरानमधील रास्त धान्य दुकानदारांनी दीड दिवसाचे गणपती विसर्जनानंतर आनंदाचा शिधा, शिधाधारकांना देण्यास सुरुवात केली. हा शिधा गणपती सणाअगोदर मिळाला असता तर आमचे सण हे आनंदात गेले असते, असे शिधाधारकांचे म्हणणे आहे. हा शिधा उशिरा का दिला गेला, याची चौकशी होणे गरजेचे आहे, असेही रेशन कार्डधारकांचे म्हणणे आहे.
माथेरानमध्ये 3 रास्तभाव धान्य दुकान आहेत, तर 640 पेक्षा अधिक शिधाधारक आहेत. या सर्वांना शासनाकडून शिधा दिला जातो, हा येथील कष्टकरी जनतेला मोठा आधार आहे. शासनाने आनंदाचा शिधा नावाने तेल, साखर, चणाडाळ अशा वस्तू शंभर रुपयात जनतेला देत आहेत, पण त्या वेळेत मिळणे अपेक्षित आहे. पण असे होताना दिसत नाही. जर हा आनंदचा शिधा वेळेत मिळाला असता तर लोकांना खासगी दुकानातून वस्तू घेताना आर्थिक भुर्दंड सोसावा नसता लागला. याबाबत कर्जत तालुका धान्य पुरवठा अधिकारी यांची संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
आनंदाच्या शिध्यामुळे अनेकांना आधार मिळत आहे. सणासुदीत हा शिधा मिळाला नाही त्यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. हा शिधा उशिरा का आला याची चौकशी व्हायला हवी. अधिकारी वर्गानेही याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
सुहासिनी दाभेकर, शिधाधारक