चार पुल बंद पडल्यास संपर्क तुटणार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ब्रिटीश कालीन वास्तूरचना किती प्रगल्भ होती. हे आजही दिमाखात उभ्या असलेल्या वास्तूंवरुन दिसून येते. रायगड जिल्ह्यांमध्ये ब्रिटीशांच्या कालावधीतील वास्तू आहेत. पैकी नागोठणे येथील आंबा नदीवरील पूल आणि पनवेल तालुक्यातील तारापूर पूलांचे स्ट्रक्टरल ऑडिटच झालेले नाही. तर पोलादपूर तालुक्यातील चोलई पूल, मोरगील पूल, शिंगडी पूल आणि घोडवली पूलाला आपत्तीचा फटका बसल्यास या पूलांवरून पर्यायी वाहतुकीचा मार्गच नसल्याने हजारो गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या काही वर्षात रायगड जिल्ह्यावर विविध आपत्ती ओढवल्या आहेत. दरवर्षी साडेतीन हजार मिमी पावसाची नोंद होते. जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस पडतो. धरणांची संख्या कमी असल्याने तसेच अस्तित्वात असलेल्या नद्यांमधील गाळ पूर्ण क्षमतेने न काढल्याने नदी काठी असणार्या गावांना महापुराच्या पाण्याचा फटका हमखास बसतो हे. गेल्या काही वर्षात आलेल्या आपत्तीवरून दिसून येते. जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे छोट-मोठ्या पूलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही पुल तर महापुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामध्ये महाड तालुक्यीतील सावित्री नदीवरील पुलाचा समावेश आहे. हा पुल कोसळल्याने जिल्ह्यातील वापरात असलेल्या सर्व पुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला होता.
तर हजारो गावे संपर्कहिन
नागोठणे येथील आंबा नदीवरील पूल 1580 साली बांधण्यात आला आहे, तर पनवेल तालुक्यातील तारापूर येथील पुल हा देखील ब्रिटीश कालावाधीतच उभारण्यात आला होता. या दोन्ही पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही. पावसाळ्यामध्ये नागोठणे आणि अलिबाग तालुक्यातील आक्षी पुलावरील वाहतुक बंद ठेवावी लागणार आहे. चोलई, मोरगील शिंगटी आणि घोडवली या पोलादपूर तालुक्यातील पुल बंद पडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गच नाही. त्यामुळे हजारो गावांचा संपर्क तुटणार आहे.
पावसाळ्यात पनवेल-तारापूर, पोलादपूर-चोलई, मोरगील, शिंगटी, घोडवली, नागोठणे-आंबा नदी आणि अलिबाग तालुक्यातील खडताळ पुलावरून वाहतुक सुरु राहणार आहे. वाहतुक सुरु राहणार असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. त्यामुळे एखादा अपघात घडल्यास जबाबदारी देखील त्यांचीच राहणार असल्याचे स्पष्ट होते. चोलई, मोरगील, शिंगटी आणि घोडवली पुलांची दुरुस्ती 2017-18 या कालावधीत झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. पनवेल तालुक्यातील तारापूर येथील पुलांची दुरुस्ती झालेली नाही. कारण तो सुस्थितीत आहे. या पुलावरील वाहतुक बंद पडल्यास 900 मीटरवर पर्यायी रस्ता आहे. काही पूलांचे काम सुरु करण्यात आलेले आहे, तर काही पूलांची पुर्नबांधणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. सरकार आणि प्रशासनाने तातडीने यामध्ये लक्ष घालून जिल्ह्यातील पुलांची उत्तम उभारणी केल्यास जनतेच्या हिताचे ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार काही पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नसले तरी, त्यातील काही पुलांची डागडुजी प्रस्तावित आहेत. पुल वापरण्यास चांगले आहेत. ज्या ठिकाणी पावसाळ्या वाहतुक सुरु ठेवता येणार नाही. ते पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येतील.