। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी रात्री खातेवाटप झाले आहे. आता महायुतीत पालकमंत्र्यासाठी कोणते जिल्हे घ्यायचे याची भांडणं होत आहेत. याबाबत मोठा दावा करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर टीका केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, अजित पवार स्वतः म्हणत असतील की, मंत्रीपदं आणि खातेवाटपावरून काही लोक नाराज आहेत, तेव्हा याच्यापेक्षा अधिक काय पुरावा पाहिजे. हा एवढा मोठा पुरावा त्यांनी दिला आहे. त्यांना जनतेचे काय घेणे देणे नाही. या सरकारमध्ये काय गडबड सुरू आहे याच्यातून स्पष्ट होत आहे. महायुतीत काहीही आलबेल नाही, हे यावरून दिसून येत आहे, असे पटोले म्हणाले आहेत.
पुढे म्हणाले की, महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी आहे. आपापसात लढून कार्यक्रम संपणार आहे. तसेच, मलाईदार खात्यांकरता संघर्ष होते. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात हे खातेवाटप करू शकले नाही. शेवटच्या दिवशी त्यांनी खातेवाटप केले. त्यातही अनेकजण नाराज असल्याची चर्चा आहे. अधिवशेनात महायुती सरकार जनतेसाठी काहीच करू शकले नाही. आता पालकमंत्र्यासाठी कोणते जिल्हे घ्यायचे याची भांडणं सुरू आहेत, असा दावा करत काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी महायुतीवर टीका केली आहे. हे सरकार जनतेमुळे नव्हे तर निवडणूक आयोग आणि केंद्रामुळे सत्तेत आले आहे. जनतेचे मते यांनी चोरले. निवडणूक आयोगाकडून नोटिफिकेशन काढण्यात आले. निवडणूक आयोगाकडून आता कोणतीही माहिती जाहीर केली जाणार नाही. याचा अर्थ दाल में कुछ काला है, असेही नाना पटोले म्हणाले.