गावपातळीवर सुसज्ज मैदान व्हावेः आ.जयंत पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

तालुक्यामध्ये क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधीची तरतूद आहे. मात्र, आवश्यक तितकी जागा उपलब्ध होत नाही. एक पंचायतमध्ये एकतरी सुसज्ज असे मैदान असणे आवश्यक आहे. प्रेक्षक गॅलरीसुद्धा याठिकाणी झाल्यास गावपातळीवर खेळाची एक वेगळी उंची वाढणार असून, खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे, असे प्रतिपाद शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी रविवारी केले.

राजन क्रिकेट क्लब आयोजित शेतकरी कामगार पक्षामार्फत शेकाप चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, अलिबाग पंचायत समितीच माजी सदस्य श्रीधर भोपी, सरपंच कृष्णा भोपी, अनंत थळे आदी मान्यवरांसह शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते, इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी आ. जयंत पाटील म्हणाले, पुरोगामी विचाराचे अनंत थळे यांच्या नेतृत्वाखाली बेलोशीमध्ये शेकापच्या माध्यमातून क्रिकेटचे सामने भरविले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, राजन क्रिकेट क्लबचे पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली. हे सामने यशस्वी होण्यासाठी बेलोशी ग्रामस्थांनी विशेष करून तरुणांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. आज गावोगावी ज्या पद्धतीने क्रिकेटचे सामने भरविले जात आहेत, त्याचा दर्जा दिवसेंदिवस सुधारत आहे, हे पाहून खऱ्या अर्थाने आनंद होत आहे. आयपीएलच्या धर्तीवर समालोचनदेखील चांगल्या पद्धतीने होत आहे. खेळातील ही प्रगती बघून समाधान होत आहे.

खेळामध्ये असलेले कौशल्य, प्रशिक्षण अशा अनेक सुविधा या मैदानातून होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. आपल्या तालुक्यातील खेळाडूंना या माध्यमातून राज्य, देश पातळीवर, जागतिक स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत जाण्याची संधी मिळेल. त्या पद्धतीने क्रीडांगण व्हावे, असा विचार करण्याची गरज आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version