अलिबागच्या पर्यटनात पडणार भर

कान्होजीराजे आंग्रे यांच्या शौर्यगाथेचे संकल्पचित्र

| रायगड | सुयोग आंग्रे |

जगाच्या नकाशावर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणाऱ्या अलिबागनगरीला ऐतिहासिक वारसा आहे. दर्यासारंग सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या शौर्याने पावन झालेल्या या भूमीमध्ये त्यांच्या शौर्यगाथेचे संकल्पचित्र उभारण्यात येणार आहे. शहरातील कान्होजीराजे आंग्रे यांच्या समाधीस्थळ परिसरात प्रादेशिक पर्यटन विकास योजना आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून समाधीस्थळ सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणामध्ये सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचा जीवनपट भित्तीचित्रांमधून पर्यटकांच्या माहितीसाठी उभारण्यात येणार असल्याने अलिबागच्या पर्यटनामध्ये अधिक भर पडून मराठ्यांचा इतिहास अनुभवता येणार आहे.

अलिबाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक आरमार प्रमुख दर्यासारंग सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे समाधीस्थळ आहे. हे समाधीस्थळ अलिबागनगरीच्या इतिहासाची साक्ष सांगत उभे आहे. हे समाधीस्थळ आणि कान्होजीराजे आंग्रे यांच्यासह अलिबागनगरीचा इतिहास पर्यटकांना समजावा यासाठी अलिबाग नगरपरिषदेमार्फत या समाधीस्थळाचे सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यापूर्वी या समाधीस्थळाचे सुशोभीकरण करून इतिहास जगासमोर आणला आहे. आता प्रादेशिक पर्यटन विकास योजना आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून समाधीस्थळाचे सुशोभीकरण करण्याचा नारळ अलिबाग नागरपरिषदेमार्फत वाढविण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2021-22 अंतर्गत अलिबाग नगरपरिषद हद्दीतील सरखेल कान्होजीराजे आंग्रे समाधीस्थळ सुशोभीकरणासाठी 2 कोटी 3 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. या अंतर्गत समाधीस्थळाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

तीन कोटींचा निधी मंजूर
अलिबाग नगरपरिषदेमार्फत प्रादेशिक पर्यटन विकास योजना आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून समाधीस्थळाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पमध्ये दोन टप्प्यात काम करण्यात येणार आहे. सौंदर्यीकरण करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अलिबाग नगरपरिषदेकडून सरखेल कान्होजीराजे आंग्रे समाधीस्थळ व उद्यान हे पर्यटन आकर्षण केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
अशी होणार कामे
प्रवेशद्वारावर गलबत नौकेची प्रतिकृती, भिंतींवर आकर्षक कोरीव काम, महत्त्वाच्या किल्ल्याांच्या प्रतिकृती, समाधीस्थळ परिसरात कृत्रिम तलावाची निर्मिती, तेजोमय प्रकाशासाठी दीपमाळा, उद्यानाची आकर्षक विद्युत रोषणाई तसेच जीवनपट, शौर्यगाथांची भित्तीचित्रके तयार करणार.
Exit mobile version