पोश्री नदीत पाणीसाठा होणार

बंधारा दुरुस्ती कामाचा शुभारंभ

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील पोश्री नदी उन्हळ्यात कोरडी पडत असते. त्यामुळे युनायटेड वे या संस्थेने जलसंजीवनी प्रकल्प अंतर्गत पोश्री नदीतील बंधारा दुरुस्त करण्याच्या कामाचा शुभारंभ केला आले. यावेळी खांडस ग्रामपंचायत हद्दीतील चाफेवाडी नदीवरील सिमेंट नाला बंधारा दुरुस्तीकरण कामाचा शुभारंभ सरपंच कचरू पादीर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, कर्जत तालुक्यातील खांडस, नांदगाव भागातील पाण्याची टंचाई काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

युनायटेड वे मुंबई संस्थेद्वारा जल संजीवनी प्रकल्प हा कर्जत तालुक्यातील आदिवासी बहूल दुर्गम भागातील खांडस, पाथरज, अंभेरपाडा, नांदगाव आणि वारे ग्रामपंचायत मधील 42 गावांत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा उद्देश गावांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. त्यात पिण्यासाठी आणि शेती सिंचनसाठी पाणी उपलब्धता करून त्याचा इष्टतम वापर करणे, शाश्‍वत शेती अंतर्गत हवामान बदलामुळे शेतीवर होणार्‍या दुष्परिणामांना कमी करून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवून राहणीमान उंचावणे, वैयक्तिक आणि स्वयं सहायता गटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणे, गुणवत्ता पूर्ण शिक्षण उपलब्ध करणे हा आहे. याच संस्थेच्या माध्यमातून पोश्री नदीवरील खांडस भागातील जुन्या बंधार्‍याची दुरुस्ती करण्याचे कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी खांडस ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल हिंदोळा, प्रकाश ऐनकर, किसान खंडवी, जगन पादीर, तसेच गाव विकास समितीचे सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version