दोन तासांत कर्ज देतो सांगून केली फसवणूक

| पनवेल | प्रतिनिधी |
दोन तासात कर्ज देतो, असे सांगून कर्ज मंजूर करण्यासाठी तब्बल 90 हजार रुपये उकळण्याचा प्रकार कळंबोलीमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी अनोळखी गुन्हेगाराविरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सेक्टर 3 ई, कळंबोली येथील गणेश गोपाळ राई यांना मुलीच्या बी फार्म प्रवेशाकरीता एक लाख 75 हजार रुपये शुल्क भरायचे होते. त्यासाठी सुरुवातीला 20 हजार रुपये भरून उर्वरित शुल्काची रक्कम कर्जाद्वारे भरण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. यादरम्यान, फेसबुकवर त्यांना धनी फायनान्स नावाच्या ॲप्लिकेशनची माहिती मिळाली. दोन तासांत कर्ज मिळेल, अशी जाहिरात असल्याने त्यांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्यात स्वतःची माहिती भरली. त्यानंतर त्यांना धनी फायनान्समधून दूरध्वनी आला व सेवाशुल्क चार्ज म्हणून 15 हजार 50 रुपये भरण्यास सांगितले. ते पैसे त्यांनी गुगल पेवर भरले. त्या वेळी इन्शुरन्स चार्जेस सात हजार 486 रुपये भरण्यास सांगितले.

त्यांनी मुलीच्या बँक खात्यावरून ते पैसेही गुगल पे वर भरले. पुन्हा जीएसटी रक्कम 12 हजार 630 रुपये भरली. त्यानंतर एनओसी चार्जेस 14 हजार 960, आरबीआय चार्जेस 22 हजार 778, दोन आगाऊ हप्ते 17 हजार 100 असे एकूण 90 हजार चार रुपये त्यांनी भरले. त्यानंतर आगाऊ म्हणून 17 हजार 30 भरायचे होते, तुम्ही 17 हजार 100 भरल्याने सिस्टीम घेत नाही, त्यामुळे 17 हजार 30 रुपये भरा, असे समोरच्या व्यक्तीकडून सांगण्यात आले. त्या वेळी पैसे नसल्याने भरलेले पैसे परत करण्यात सांगितले असता, रिफंडसाठी 7 हजार 250 रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्या वेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तक्रार दाखल केली.

Exit mobile version