कचरा टाकून अपमानास्पद वागणूक

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राज पार्टे व त्यांच्या सहकाऱ्यांनी औषध निर्माण अधिकाऱ्यावर कचरा टाकून अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, श्रीवर्धन येथील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या कृत्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दि.20 जुलै रोजी दुपारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात मनसेेचे राज पार्टे आणि त्यांचे कार्यकर्ते सदिच्छा भेटीसाठी आले होते. यावेळी औषध वाटप विभागात त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. कर्ण बेलकोने व औषध निर्माण अधिकारी सागर सानप यांच्याशी अरेरावी केली. रुग्णालयातील अस्वच्छतेचा दाखला देत कार्यकर्त्यांनी बेसिन वर चढून कपाटावरील व खिडकीतील धूळ काढून ती थेट औषध निर्माण अधिकारी सानप यांच्या डोक्यावर टाकली व ॲप्रॉनला पुसली. या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी म्हसळा पोलिसांकडे तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे. या घटनेचा श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील वैद्यकीय वर्तुळाने निषेध केला असून, “रुग्णसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर असा अन्याय खपवून घेतला जाणार नाही; दोषींवर तातडीने कडक कारवाई व्हावी,” अशी आक्रमक भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे.

Exit mobile version