| रसायनी | वार्ताहर |
अमेझॉन कंपनीच्या गोडाऊनमधून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणार्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वानिवली येथील अमेझॉन कंपनीच्या गोडाऊनमधील 3,82,600 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला असता लोहप, तळवली ते नवी मुंबई या ठिकाणापर्यंत एकूण 28 सीसीटीव्ही फुटेज तपासून ज्या वाहनातून मुद्देमान चोरून नेला होता त्या टेम्पो एमएच 43 सीई 5399 हा नंबर प्राप्त करून नमूद टेम्पोच्या मालकाचे नाव निष्पन्न केले.
त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचे मालक यास चौकशीकामी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने त्याचा टेम्पो हा रात्रीच्या वेळी संजय गंगा मंडल तुर्भे एमआयडीसी मूळ रा. राज्य बिहार यास पुठ्ठा वाहण्यासाठी भाड्याने देत असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने संजय गंगा मंडल यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने त्याचे इतर दोन साथीदार सुभाष लाले यादव रा. इंदिरानगर सर्कल तुर्भे मूळ उत्तर प्रदेश व महादू राजू उपले रा. गणपती मंदिर तुर्भे एमआयडीसी मूळ बुलढाणा यांनी घटनास्थळावरून चोरी केल्याचे कबूल केले. गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपींकडून तुर्भे येथील त्यांच्या राहत्या झोपडीच्या कोपर्यात लपून ठेवलेला सर्व मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा एकूण 6,82,600/- रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, विक्रम कदम, उपविभागीय अधिकारी खालापूर, संजय बांगर वरीष्ठ पोलीस निरीक्षक रसायनी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लालासाहेब कोळेकर, पोलीस हवालदार सचिन चौरे या पथकाने केली.