अलिबागमध्ये भुरटे चोर सक्रीय; पिंपळभाटमध्ये घरफोडी

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग शहरानजीक असलेल्या पिंपळभाट येथील बंगला फोडण्याचा प्रयत्न चोरटयाने केला. मात्र काहीच सापडले नसल्याने बंगल्यासमोर असलेली दुचाकी लंपास केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ ते शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने भुरटे चोर सक्रीय झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. पोलीस निरीक्षक शिरीष पवार याकडे लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिवा ट्रॅव्हल्सचे मालक शिवपुत्र हलगिनो यांच्या मालकीचा स्वयंभू नावाचा बंगला पिंपळभाट येथील समर्थ नगर या ठिकाणी आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांचे चालक मोहन लोगडे यांनी स्वयंभू बंगल्याच्या आवारात त्यांची दुचाकी पार्कींग करून कामानिमित्त बाहेर गेले होते. गुरुवारी सायंकाळी ते काम आटोपून परत आल्यावर बंगल्याच्या आवारात पार्कींग करून ठेवलेली दुचाकी घेऊन ते त्यांच्या घरी निघाले. कित्येक वेळ दुचाकी सुरु करण्याचा प्रयत्न केला. परंतू दुचाकी सुरु होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर लोगडे यांनी त्यांची दुचाकी त्याचठिकाणी ठेवून शिवपूत्र हलगिनोर यांच्या मालकीची दुचाकी घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास लोगडे स्वयंभू बंगल्याजवळ आल्यावर दुचाकी जागेवर दिसली नाही. ही बाब त्यांनी शिवपूत्र हलगिनोर यांंच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे दुचाकीचा सोशल मिडीयासह वेगवेगळ्या माध्यमातून शोध घेण्यात आला. मात्र दुचाकी सापडली नाही. शिवपूत्र हलगिनोर व मोहन लोगडे यांनी स्वयंभू बंगल्यासमोरील दरवाजा पाहिला असता, दरवाजाची कडी तुटलेली होती. घरात जाऊन पाहिले असता, कपाटातील सामान, खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यामुळे घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला असून चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याचा संशय बळावला.

या घटनेने अलिबागमध्ये भूरट्या चोरट्यांनी डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. भुरटे चोर सक्रीय झाले असल्याचे चर्चा पसरली आहे. त्यामुळे नव्याने दाखल झालेले अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version