तक्रारीच्या फोन आल्यानंतर काही मिनिटांत चोरटे जेरबंद

| पनवेल | प्रतिनिधी |

कळंबोली परिसरात मोबाईल हिसकावण्याची घटना घडल्यानंतर नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला करण्यात आलेल्या एका तक्रारीमुळे अवघ्या काही मिनिटांत दोन चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करण्यात आले.

कळंबोली येथील बीमा कॉम्प्लेक्स ते फुडलॅण्डकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर ही घटना घडली. 36 वर्षीय भंगार व्यावसायिक आपल्या कामानिमित्त या रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्याला अडवले. या तरुणांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तेथून पळ काढला. घटनेनंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने जवळील इतर व्यावसायिकांना याची माहिती दिली. सुरुवातीला परिसरातील नागरिकांना या घटनेवर विश्वास बसला नाही. मात्र, एका व्यावसायिकाने तत्काळ नवी मुंबई पोलिसांच्या 112 या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली.

नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचे वर्णन त्वरित कळंबोली पोलीस ठाण्यास पाठविण्यात आले. तसेच परिसरात गस्त घालणाऱ्या बीट मार्शलना सतर्क करण्यात आले. पोलिसांनी फुडलॅण्ड कंपनीसमोरील रस्त्यावर संशयित दुचाकीस्वारांची तपासणी सुरू केली. या तपासादरम्यान सकाळी साडेदहा वाजता दोन संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले आणि पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, मोबाईल चोरी झालेला व्यावसायिकही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला असता त्याने या दोघांना ओळखले.

Exit mobile version