| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमधील इंदिरा गांधीनगर येथील साईकृपा कोल्ड्रिंग्स व किराणा स्टोअरमध्ये शुक्रवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे टाळे व कड्या उचकटून दुकानात प्रवेश करत रोख रक्कम व सिगारेटच्या पाकिटांसह अंदाजे 15 ते 20 हजार रुपयांचा माल लंपास केला. दुकानाचे मालक महेंद्र जाबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूने प्रवेश करून आणि मागचा दरवाजा, पुढील शटरचा भाग व आतील दरवाजे असे एकूण तीन दरवाजे तोडून दुकानात प्रवेश केला.
दरम्यान, कर्जत, नेरळ गावात असा प्रकार घडत असतानाच माथेरान परिसरातही चोरीच्या घटना सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माथेरान पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ए. एम. सोनाने व एपीआय गणेश गिरी हे या घटनेचा तपास करत आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांनी या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यातच याठिकाणी सुट्ट्यांच्या हंगामात मोलमजुरी करण्यासाठी परिसरातून अनेक नवनवीन लोक येत असतात. त्यांचे ओळखपत्र पोलीस ठाण्यात असावे. जेणेकरून भविष्यात काही अन्य घटना घडल्यास चौकशी करणे शक्य होईल, अशी मागणी सुध्दा जोर धरू लागली आहे.
माथेरानमध्ये चोरट्यांनी दुकान फोडले
