शिवसेना नेते अनंत गोंधळींची सोन्याची चेन चोरीला
| रायगड | खास प्रतिनिधी |
महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची गुरुवारी जाहिर सभा पार पडली. या प्रसंगी चोरट्यांनी आपला हातसाफ केला. शिवसेना शिंदे गटाचे नेते अनंत गोंधळी यांची तब्बल साडेतीन तोळ्यांची सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवली. त्यामुळे तटकरेंचा प्रचार करणे गोंधळी यांना आर्थिक दृष्ट्या चांगलेच नुकसानीचे ठरले आहे. तटकरेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी डिकेटी शाळेसमोरील मोकळ्या जागेवर जाहिर सभा पार पडली. यासभेत शिवसेना नेते अनंत गोंधळी व्यासपिठावर उपस्थित होते. सभा संपल्यानंतर सर्व नेते व्यासपिठावरुन खाली उतरत होते. तटकरे हे आपल्या निवडक नेते आणि पदाधिकार्यांसह अर्ज दाखल करण्यासाठी निघुन गेले.
त्यांच्या पाठोपाठ गोंधळी हे देखील खाली उतरत असताना त्यांच्या गळ्यातील चेन कोणी तरी ओढत असल्याचे जाणवले. मागे वळून पाहण्या आधीच त्यांची साडेतीन तोळ्याची चेन कोणीतरी अज्ञाताने खेचून घेतली. चेनमधील सोन्याचे लॉकेट मात्र, त्यांच्या शर्टमध्येच अडकले, असे गोंधळी यांनी सांगितले. तटकरेंच्या सभेत चोरांचा सुळसुळाट वाढल्याने सभेत येणार्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.