पनवेलमध्ये दीड वाजेपर्यंत 31 टक्के मतदान

| अलिबाग | जिल्हा प्रतिनिधी |

प्रदिर्घ कालावधीनंतर पनवेल महानगर पालिकेची निवडणूक प्रक्रीया पार पडली. गुरुवारी झालेल्या मतदानाला दुपारपर्यंत उत्स्फुर्त प्रतिसाद मतदारांकडून मिळाला. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी दीड वाजेपर्यंत 31 टक्के मतदान झाले. या कालावधीत एकूण 1 लाख 73 हजार 523 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 78 हजार 627 महिला, 94 हजार 881 पुरुष तर 15 इतर मतदारांचा समावेश आहे. सकाळच्या सत्राच्या तुलनेत दुपारपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे.

प्रभाग एकमध्ये 50 टक्के व दोनमध्ये 51 टक्के मतदान झाले. या ग्रामीण भागात दुपापर्यंत चांगले मतदान झाल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. तर प्रभाग 14 मध्ये शहरी भागात फक्त 24 टक्के मतदान झाले. काही प्रभागांमध्ये 49 ते 50 टक्क्यांपर्यंत मतदान झाले असून, तर बहुतांश प्रभागांमध्ये 25 ते 35 टक्क्यांची नोंद करण्यात आली आहे. मतदारांमध्ये विशेषतः महिला मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असून कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारनंतर आणि सायंकाळच्या सत्रात मतदानाचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज निवडणूक प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Exit mobile version