निवडणूक आयोगापुढे शरद पवार गटाची भूमिका; पुढील सुनावणी सोमवारी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केल्याने फूट पडली आहे. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केला आहे, असा दावा शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. याबाबत पुढील सुनावणी सोमवारी नऊ ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे.
राष्टवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे याबाबत निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीला खुद्द शरद पवार उपस्थित होते. दोन तास ही सुनावणी चालली. आमची बाजू ऐकून न घेता पक्षात वाद असल्याचा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय चुकीचा असू शकतो. त्यामुळे आधी आमची बाजू ऐकून घ्या आणि मगच निर्णय जाहीर करा, असे निवडणूक आयोगाला सिंघवी यांनी सांगितले. तसेच दुसरा मुद्दा नैसर्गिक न्यायाचा असल्याचे सांगत सिंघवी म्हणाले, आम्ही प्रतिवादी आहोत. त्यामुळे आम्ही उत्तर देणार आहोत’.
याचिकाकर्त्याचा युक्तीवाद झाल्यानंतर आमचे म्हणणे ऐकले जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आयोगाने दिल्याचे सिंघवींनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेईल” असेही सिंघवींनी स्पष्ट केले. “मृत व्यक्तींच्या नावाने कागदपत्रे अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली. खोटी कागदपत्रे सादर करून अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे, असाही दावा सिंघवी यांनी केला.
राष्ट्रवादी पक्षाचा चेहरा शरद पवारच आहेत,” असेही ते म्हणाले.
राज्य आणि बाहेरही पक्ष कुणाचा हे सर्वांना माहिती आहे. अजित पवार गटाची पक्षाच्या विरोधात भूमिका आहे. एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे आहे. 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पवारांना पाठिंबा आहे. पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली. शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड पक्ष घटनेला धरून आहे. त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शरद पवार यांनी घेतलेले निर्णय डावलता येत नाहीत. शरद पवारांचे नेतृत्व मान्य असे पत्र प्रदेशाध्यक्षांनी दिले आहे. निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवण्यात येऊ नये, आदी मुद्दे शरद पवार यांच्या वतीने यावेळी मांडण्यात आले.
अजित पवार गटाचा युक्तिवाद काय?
विधानसभेचे 42 आमदार, विधानपरिषदेचे 6 आमदार, नागालँडमधील 7 आमदार, लोकसभा आणि राज्यसभेचे प्रत्येकी एक खासदार अजित पवार गटाकडे आहेत. अजित पवार यांची 30 जूनला बहुमताने अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्याबरोबर आहेत. विधानसभा, विधानपरिषदेचे अधिक संख्याबळ आमच्याकडे आहे. कोअर कमिटीतील सदस्यही आमच्याबरोबर आहेत. अनेक वर्षापासून पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत, हे अजित गटाचे मुख्य मुद्दे आहेत.






