| जळगाव | प्रतिनिधी |
सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाल्यांनतर ‘इंडीया’ नाव आलं. या नावाची भीती वाटायला लागली. मग आता पक्ष फोडायचे कारभार सुरु केले, त्यानंतर आता इंडिया नावचं बदलायचा घाट घातला जात आहे. आता आम्ही आमचे नाव बदलणार नाही, तर पंतप्रधान बदलणार, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. रविवारी जळगाव येथे जाहीर सभेत ते बोलत होते. जालना येथे झालेला लाठीमार म्हणजे जालनावाला कांड असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी कार्यकर्त्यांनी देश का नेता कैसा हो, उद्धव ठाकरे जैसा हो, अशा घोषणा दिल्या. त्यावर त्यांना थांबवून ते म्हणाले की, ‘देश का नेता नाही, देश का नागरिक कैसा हो, या घोषणा देण्याची वेळ आली आहे. इंडिया आघाडी उभी राहिल्याने केंद्र सरकार घाबरले आहे. कधी पडेल काही सांगता येत नाही. आधी त्यांना वाटत होते, आम्हाला कोणी आव्हान देऊ शकणार नाही. मात्र सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाल्यांनतर इंडिया नाव आलं.
मोदी असो कोणीही असो, सर्वजण भाषण करताना उद्धव ठाकरे नाव घेतात. या लोकांनी माझा पक्ष संपवला ना, मग माझे नाव का घेतात, असा सवालही त्यांनी केला. दिल्लीला जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांना वेळ आहे, परंतु मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी त्यांना वेळ नसल्याची टीका ठाकरेंनी यावेळी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, “दिल्लीत जी-२० देशांची बैठक होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना तिथे जाण्यासाठी वेळ आहे. पण जालना येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी वेळ नाही. त्यांच्या मागण्या काय आहेत. किमान त्यांच्यासोबत बोला तरी, आम्ही गेलो होतो. जरांगे यांच्यासोबत अजूनही सरकारचा कोणता अधिकृत प्रतिनिधी संवाद साधत आहे का?, एक दाढीवाला गद्दार (अर्जुन खोतकर यांच्यावर टीका) जातोय फक्त.”
हे तर ‘जालना’वाला कांड..
“मी अंतरवाली सराटी गावात जाऊन आलो आहे. पोलीसदेखील माणसं असून, कोरोना काळात त्यांनी आपला जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव वाचवले आहेत. पण, अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या लोकांचे असे काय चुकले होते की, पोलीस आले आणि दणादण मारत सुटले. जसा जालियानवाला कांड झाला होता तसाच हा ‘जालना’वाला कांड झाला आहे. अशी राक्षसी वृत्ती महाराष्ट्रात आली कधी,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली.
‘इंडिया’च्या बैठकीत मला अध्यक्षपद मिळाले
“सत्ता आली काय आणि गेली काय, मी सत्तेसाठी धडपडत नाही. माझ जीव तुमच्यासाठी आणि देशासाठी जळतोय. मागे आमची इंडिया म्हणून बैठक झाली. त्याचं अध्यक्षपद आमच्या शिवसेनेला (ठाकरे गट) देण्यात आले होते. तिथे देशातील सर्व मोठे नेते आले होते. तिथे मला एक किंमत होती आणि ती तुमच्यामुळे मिळाली.