श्रावण सृजन भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन
| रायगड । प्रतिनिधी ।
भारत देशात आजही पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा आहे. असे असतानाही आजची महिला आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झालेली दिसते. यशस्वी महिलांच्या पाठी पुरुष खंबीरपणे उभे राहिल्याचा आपला इतिहास आहे. असे असलेतरी महिलांचे योगदान स्मरणात राहणारे आहे. महिलांनी क्रांती करून चळवळ उभी केली पाहिजे. ‘अलिबागसे आये हो क्या’, असे म्हणणाऱ्यांना उद्योग क्षेत्रातील यशाने चपराक देत ‘मैं अलिबागसे ही आई हूँ’, असे अभिमानाने म्हणायला हवे. असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.
आम्ही अलिबागच्या उद्योगिनी सामाजिक व सांस्कृतिक संस्था आयोजित श्रावण सृजन भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उदघाटन चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उद्योजक महिलांना मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अलिबाग नगर पालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, चेंढरे ग्रामपंचायत सरपंच स्वाती पाटील, अपूर्वा पतसंस्थेच्या अध्यक्षा कविता ठाकूर, प्रीतम गांधी, ज्योत्स्ना चौगुले, पूजा काठे, अनिता निगडे, प्रार्थना नागवेकर आदी उपस्थित होते.
आजच्या स्पर्धेच्या युगात डिजिटल क्रांतीने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. याच माध्यमातून आम्ही अलिबागच्या उद्योगिनी ग्रुपने उद्योजक महिलांना एकत्रित करून त्यांना उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. हे वाखाणण्याजोगे आहे. शेतकरी कामगार पक्षाने देखील ‘मी होणार स्वावलंबी’ असा उपक्रम सुरू केला आहे. तब्बल 150 महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी मदत केली आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
ग्रामीण भागात खरा भारत दडलेला आहे. शेतकरी आणि कामगारांच्या माध्यमातून देशाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. खेड्यातील उत्पादनाला भारतात साधी बाजारपेठ उपलब्ध नाही. यामुळे त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. खेड्यापाड्याती उद्योजक खास करून महिला उद्योजक महिला बचत गटांच्या माध्यमातून विश्व भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. ग्रामीण उद्योजकांना संधी न देता भाजप सरकार अदानी आणि अंबानी यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठे उपलब्ध करून देत आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
आम्ही अलिबागच्या उद्योगिनी या ग्रुपने गृहिणींना उद्योजक अशी ओळख उभी करून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. लघु उद्योजक हि पाहिलीपायरी असून मोठे उद्योजक बनून तुमचा ब्रँड निर्माण होईल असा विश्वास ॲड. मानसी म्हात्रे यांनी बोलून दाखविला. आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून आम्ही अलिबागच्या उद्योगिनी संस्थेचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक पतसंस्था उद्योग उभारण्यासाठी आर्थिक हातभार लावतात. केलेले उत्पादन विक्री करण्यासाठी या उद्योजकांना बाजारपेठ मिळत नाही ही बाजारपेठ उपलब्ध झाली तर महिला अधिक सक्षम होतील.
श्रावण सृजन या कार्यक्रमादरम्यान मराठमोळी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी ऑनलाईन सहभाग नोंदविण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. 15 महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये आरती सुतार यांनी प्रथम, अंकिता काळेकर द्वितीय आणि सायली यावलकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते या तीन विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.
अलिबागकारांचे जिव्हाळ्याचे असणारे पीएनपी नाट्यगृह स्थानिक कलाकार, नाट्य रसिक आणि प्रेक्षकांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार झाले होते. हे व्यासपीठ आगीने हिरावून घेतले होते. निराश आणि हताश झालेल्या अलिबागकारांच्या सेवेत लवकरच पीएनपी नाट्यगृह नव्याने उभे करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पीएनपी नाट्यगृह अलिबागकारांच्या सेवेत रुजू होईल, असे आश्वासन शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिले.