डॉ. उदय जोशी यांचे मत
| अलिबाग | प्रतिनिधी |
जाचक अडचणीमधून पतसंस्थांची सुटका झाली पाहिजे. एकमेकांशी स्पर्धा करण्याचा मोह त्यांनी टाळला पाहिजे. आर्थिक शिस्त पाळण्याची बंधने असली पाहिजेत, असे मत सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांनी व्यक्त केले. यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन चंद्रशेखर वागळे हे होते. नेत्रदान चळवळीचे कार्यकर्ते श्रीपाद आगाशे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी व्हाइस चेअरमन मन्सूर सैय्यद, सेक्रेटरी पराग पोवळे, संचालक डॉ. राजेंद्र चांदोरकर, संपदा वार्डे, गणेश चांदोरकर, बद्रीनाथ कुलपे, सचिन पितळे, दिपक जैन, डॉ. प्रतिभा म्हात्रे, व्यवस्थापक शैलेश पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. उदय जोशी म्हणाले, “पतसंस्थांनी आपल्या सभासदांना आर्थिक धोरणाबाबत शिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच आर्थिक शिस्त, आर्थिक पथ्य पाळले पाहिजेत. वाढीचे आणि विकासाचे योग्य प्रमाण ठेवायला हवे त्यासाठी नैसर्गिक व्यवसाय वाढ अपेक्षित आहे. कर्जाचा विनियोग जितका चांगल्या पद्धतीनं करता येईल तितका करायला पाहिजे. संकटाना तोंड देण्यासाठी वैयक्तिक भागभांडवल असायला पाहिजे.” चेअरमन चंद्रशेखर वागळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पतसंस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी सभासदांसाठी 12.5 टक्के लाभांश जाहीर केला. पतसंस्थांच्या विस्तारासाठी डिजिटलायझेशन महत्वपूर्ण असल्याचे वागळे यावेळी म्हणाले.
यावेळी शेतकरी कर्ज पुरवठा उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल आरडीसीसी बँकेचे अभिनंदन केले. जयंत वाखारकर, ज्येष्ठ पत्रकार महेश पोरे यांचा गौरव करण्यात आला. लेखा परीक्षक संदीप गोठीवरेकर यांनी पतसंस्थेच्या आर्थिक बाबिबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन प्राचार्या भावेश्री वाळंज यांनी केले .