‘हा’ रस्ता वाहतुकीसाठी बंद

पुरात संपूर्ण रस्ता गेला वाहून, उरली फक्त पायवाट
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ-कळंब राज्यमार्गाला जोडणारा माले-पोशीर रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेला असून रस्ता वाहतूकीसाठी पूर्ण बंद झाला आहे. या रस्त्यावर फक्त पायवाट उरली आहे. तसेच संपूर्ण रस्ता 22 जुलै रोजी झालेल्या पुरात खचल्याने संपूर्ण मातीचा भराव शेतात जावून शेतकर्यांचे देखील प्रंचड नुकसान झाले आहे. तसेच हा रस्ता खचल्याने परिसरातील नागरिकांना सात ते आठ किमीचा फेरा मारावा लागत आहे. त्यामुुळे या रस्त्याचे काम नव्याने लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
कर्जत तालुक्यतील पोशीर-माले रस्ता या दोन वर्षापूर्वी देखील पुराच्या पाण्याने खचून रस्ता नादुरूस्त झाला होता. यावेळी देखील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. परंतू बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनींधीनी याकडे दुर्लक्ष केले. परिसरातील नागरिकांची मागणी असताना देखील दोन वर्षात या रस्त्याची साधी डागडूजी देखील बांधकाम विभागाने केली नाही. त्यामुळे दोन वर्षांत रस्त्यावरून प्रवास करतांना मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.यावर्षी हा रस्ता पुराच्या पाण्याने संपूर्ण वाहून गेला असून फक्त पायावाट या रस्त्यावर उरली आहे. आणि हा रस्ता वाहतुकीस पूर्ण बंद झाला आहे.
रस्ता खचल्याने परिसरातील माले, आसे, आर्ढे फराटपाडा तसेच अनेक गांवामधील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना कळंब मार्ग सुमारे सात ते आठ किमीचा हेलपाटा मारावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्काळ दखल घ्यावी आणि हा रस्त्या नव्याने चांगल्या दर्जाचा करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version