लहान मुलांच्या आजारावरील उपचारांसाठी हे सेमिनार उपयुक्त – पालकमंत्री आदिती तटकरे

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्यातील तज्ञ डॉक्टर सेमिनार च्या माध्यमातून एकत्र येऊन बालक रोगांविषयी चर्चा करीत आहे. याचा लहान मुलांवरील आजारांवर उपचार करण्यासाठी निश्‍चितच लाभ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज मुरुड येथे केले. मुरुड तालुक्यातील काशीद येथील प्रकृती रेसॉर्ट येथे राज्यातील विविध तज्ञ डॉक्टरांचे तीन दिवसीय सेमिनार सुरू आहे, या सेमिनारच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. वाय.के. आमडेकर, डॉ.उदय बोधनकर, डॉ.राजू शहा, डॉ.नितीन शहा, डॉ.विजय येवले, डॉ.बकुळ पारेख, डॉ.जयंत उपाध्येय,डॉ. राजीव धामणकर, डॉ.दाभाडकर, डॉ.महेश मोहिते आदिंसह इतर डॉक्टरही उपस्थित होते.

पालकमंत्री आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, हे सेमिनार राज्यातील लहान बालकांच्या विविध आजारांवर उपचार करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरणार असून याद्वारे लहान बालकांना होणार्‍या विविध रोगांवर एकच उपचार पद्धती अंमलात आणता येईल. या माध्यमातून उपस्थित डॉक्टरांचा अनुभव व परीक्षण याद्वारे लहान मुलांना चांगले उपचार मिळण्यास मदत होईल. त्या पुढे म्हणाल्या की, करोनाच्या कोणत्याही लाटेशी सामना करण्याची आमची तयारी आहे. परंतु लहान मुलांना करोना झाल्यास अद्ययावत व तांत्रिक पद्धतीने त्या बालकांवर कसे उपचार करता येतील, यासाठी या सेमिनारसाठी उपस्थित तज्ञ डॉक्टरांनी आपले अनुभव पणाला लावले आहेत. या अनुभवी डॉक्टरांच्या ज्ञानाचा ग्रामीण भागातील डॉक्टरांनादेखील उपयोग व्हायला हवा. त्यामुळे ग्रामीण भागातील लहान मुलांचेही आरोग्य सदृढ राहण्यास महत्वपूर्ण योगदान मिळेल.

रायगड जिल्ह्याचा हा गौरव आहे की, प्रशिक्षित व अनुभवी डॉक्टर यांचे तीन दिवसीय सेमिनार या जिल्ह्यात घेण्यात आले, लहान मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हा एक चांगला उपक्रम येथे आयोजित करण्यात आला आहे, असे बोलून त्यांनी बालकांचे कुपोषण कसे दूर करता येईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या सेमिनारच्या माध्यमातून कुपोषणासारख्या समस्येवर दीर्घकालीन उपाय सुचविल्यास संपूर्ण राज्याला याचा उपयोग होईल,अशी आशा व्यक्त केली. रायगड जिल्ह्यासाठी शंभर बेड्ससह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील मुलामुलींना वैद्यकीय शिक्षण व पदवी प्राप्त होण्यास तसेच जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक आरोग्य सोयी सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अत्यंत महत्वपूर्ण योगदानाबद्दल सर्व डॉक्टरांनी पालकमंत्री कु.तटकरे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला व त्यांचे विशेष आभारही मानले.

Exit mobile version