। मुंबई । वृत्तसंस्था ।
बालकांचे न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी देण्यात येणारी न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) या लशीचा समावेश राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत करण्यात आला असून, त्यामुळे राज्यात बालकांना ही लस आता मोफत दिली जाणार आहे. दरवर्षी सुमारे 19 लाख बालकांना ही लस दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
बालकांना बीसीजी, पोलिओ, रोटाव्हायरस, पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई, डीपीटी इत्यादी लशी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जातात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बालकांचे न्यूमोनियापासून संरक्षण करण्याकरिता पीसीव्ही लस दिली जाणार आहे. राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत मंगळवारपासून या लशीचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयांमध्ये ही लस सशुल्क उपलब्ध असून आता सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे डॉ. डी. एन. पाटील यांनी सांगितले. बालकांना पीसीव्ही लशीच्या तीन मात्रा दिल्या जाणार आहेत. नियमित लसीकरण कार्यक्रमात ही लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर अर्भकांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल, असे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.