यंदा गणेशभक्तांचा प्रवास होणार सुकर

वाहतूककोंडीचे विघ्न संपणार; महामार्गावर 24 तास पोलीस तैनात

| माणगाव | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड पोलिसांचे नियोजन आणि ठिकठिकाणी पर्यायी मार्ग काढून गेली अनेक वर्षापासून महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न यंदाच्या वर्षी सोडविण्यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी गणेशभक्तांच्या प्रवासातील विघ्न पोलिसांच्या नेटक्या नियोजनातून दूर होणार आहे. यासाठी रायगड पोलिसांचा ताफा महामार्गावर तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना यंदाच्या वर्षी लाडक्या गणरायाचे दर्शन वेळेवर मिळणार आहे.

माणगावात वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस गणेशोत्सवापूर्वीच माणगाव बाजारपेठेतील महामार्गालगतची अतिक्रमणे हटवण्याचे मोहीम नगरपंचायत व पोलीस यांनी हाती घेतली आहे. तसेच दुभाजक बसविण्याचे काम चालू झाले आहे. महामार्गावरील वाहतुकीची कोंडी कशी सोडवायची हा प्रश्नच रायगड पोलिसांपुढे अनेक वर्ष उभा होता. मात्र यंदाचे वर्षी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची तसेच या मार्गाला पर्यायी रस्त्यांचा वापर करून महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी कसा करता येईल, याचे नियोजन केले आहे. तसेच पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरु करून कोकणात व तळकोकणातील प्रवासी, नागरिक गणेशभक्तांना या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर, माणगाव, लोणेरे बाजारपेठेत वहातुक कोंडी होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दुभाजक बसवून एकरी वाहतूक केली आहे. माणगाव तालुक्यात माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी नियोजन बद्ध बंदोबस्त आखला आहे. याशिवाय महत्वाच्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 6 उपविभागीय पोलीस अधिकारी, 10 पोलीस निरीक्षक, 52 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 76 वाहतूक पोलीस कर्मचारी, 405 पोलीस असे खारपाडा ते कशेडी घाटापर्यंत महामार्गावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान ठिकठिकाणी वाहतूक मदत केंद्र, 10 सुविधा केंद्रे, महामार्गावर क्रेन, जेसीबी, अम्बुलन्स खाजगी व सरकारी तयार ठेवण्यात आले आहेत. तसेच स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.
गणेशभक्तांना प्रवासादरम्यान अडचण भासू नये, म्हणून महामार्गावर इंदापूर येथील हॉटेल माही व माणगाव गारळ येथील हॉटेल आनंदभुवन येथे सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रांमधून माहिती, विश्रांती तसेच आपत्कालीन मदत उपलब्ध होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महामार्गावर सरकारी व खाजगी ॲम्बुलन्स उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. वाहन बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास तत्काळ ती वाहने बाजूला करण्यासाठी जेसीबी, स्क्रेन यांचीही यंत्रणा सज्ज आहे. यंदाच्या गणेशोत्सवात लाखो भाविकांना आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेऊन सुखरूप घरी परतता यावे, यासाठी हा बंदोबस्त निश्चितच एक भक्कम सुरक्षा कवच ठरणार आहे.
Exit mobile version