13 मैदानांवर उद्घाटन समारंभ
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमिअर लीग 2025 ची सुरुवात 22 मार्च रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटनीय सामना होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यापूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे 18वे पर्व चाहत्यांसाठी खास बनवण्यासाठी सर्व 13 ठिकाणी उद्घाटन समारंभ आयोजित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
आयपीएलचा पहिला उद्घाटन सोहळा 22 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे एका भव्य समारंभात होणार आहे. त्यामध्ये 30 मिनिटांच्या कार्यक्रमात बॉलिवूड सुपरस्टार आणि संगीत जगतातील प्रसिद्ध व्यक्ती सादरीकरण करणार आहेत. त्यात बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी या सादरीकरण करणार आहेत. यावेळी आयसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह देखील उपस्थित राहणार आहेत. कोलकाता व्यतिरिक्त इतर 12 ठिकाणी होणार्या या कार्यक्रमासाठी बॉलिवूड कलाकारांचा एक वेगळा गट सादर करण्याचा विचार करण्यात येत आहे. या कार्यक्रमांसाठी दोन ते तीन कलाकारांची निवड केली जाऊ शकते. यासाठी कलाकार आणि सेलिब्रिटींची यादी 19 मार्चपर्यंत तयार केली जाणार आहे. आयपीएलमध्ये हे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात घडत आहे, त्यामुळे काही लॉजिस्टिक समस्या उद्भवत आहेत. त्यासाठी बीसीसीआय आणि राज्य संघटना एकत्रितपणे काम करत आहेत. जेणेकरून सामन्यांमध्ये कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण करता येईल.