एमएसआयडीसीचा ढिसाळ कारभार रस्त्यावर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग व मुरूड तालुक्यात सुरू असलेली काँक्रिट रस्त्यांची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेलीच आहेत. ठिकठिकाणी रस्ते खोदून तसेच सोडण्यात आले असून, या खड्ड्यांतून प्रवास करताना नागरिकांचा अक्षरशः जीव मेटाकुटीला येत आहे. एमएसआयडीसीमार्फत सुरू असलेल्या या कामांचा वेग अत्यंत संथ असून, कामकाजातील निष्काळजीपणाचा फटका थेट सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ही कामे पूर्ण होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे यंदाचा पावसाळा नागरिकांना चिखलातूनच काढावा लागणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अलिबाग बायपास ते सहाण बायपास, वावे-चौल, बागमळा-चौल, साळाव ते बोर्ली, तसेच मुरूड ते विहूर या मार्गांवर मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाची कामे सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात या कामांमध्ये कोणतीही गती दिसत नाही. परिणामी, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून, धुळीच्या ढगांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. नाका-तोंडात जाणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच रस्त्यांची बिकट अवस्था पाहता, अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यांसोबतच काही ठिकाणी पुलांची कामेही सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या सर्व कामांमध्ये समन्वयाचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रवासीवर्गात यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून, एमएसआयडीसीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मे महिना संपत आला असून, जूनमध्ये पावसाळा सुरू होणार आहे. हवामान विभागाने यंदा पावसाळा लवकर येण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण रस्त्यांच्या कामांमुळे परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर ही कामे ठप्प होण्याची शक्यता असून, खोदलेले रस्ते आणि अर्धवट पूल नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. सध्या उघडी पडलेली माती पावसात रस्त्यावर पसरून चिखलाचे साम्राज्य निर्माण होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असून, अपघातांची शक्यता अधिक वाढणार आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणे अशक्य असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही संबंधित यंत्रणा निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. परिणामी, यंदा पावसाळ्यात चिखलातून प्रवास करणे नागरिकांच्या नशिबी आले आहे.
चिखल ठरणार अपघाताला कारणीभूत
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्या वेळीच रस्त्यांवर साचलेल्या चिखलामुळे वाहन चालविणे धोकादायक बनले होते. अनेक ठिकाणी चालकांना तारेवरची कसरत करावी लागली, तर काही ठिकाणी वाहने घसरून अपघातही झाले. या पार्श्वभूमीवर, रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास यंदा मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घराघरात पाणी शिरण्याचा धोका
एमएसआयडीसीमार्फत चौल-वावे आणि परिसरात काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी कामे प्रगतीपथावर असली तरी अनेक ठिकाणी ती संथ गतीने सुरू आहेत. विशेषतः चौल परिसरात करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामामुळे पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कडेला पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी, पावसाळ्यात पाणी थेट घरांकडे वळण्याची शक्यता असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
