। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्याच्या पूर्व भागाला, करंजा बंदर व उरण शहराला जोडणाऱ्या द्रोणागिरी कोस्टल रस्त्यावर काटेरी बाभळींची झुडपे वाढल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर आलेल्या काटेरी फांद्या चुकविताना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी सिडकोने काटेरी बाभळींची झाडे काढून टाकावी, अशी मागणी प्रवाशांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू यामुळे उरण तालुक्याला अगन्य महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सिडकोने द्रोणागिरी नोडमध्ये कोस्टल रस्त्याची निर्मिती केली. परंतु, या रस्त्याच्या दुतर्फावर काटेरी बाभळीच्या फांद्या वाढून रस्त्याच्या मधोमध आल्या आहेत. दोन वाहने पास होताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकीचालकांना अनेकवेळा काटेरी फांद्या अंगाला लागत असून या फांद्या धोकादायक ठरत आहेत. एकंदरीत हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून लहान-मोठ्या वाहनांची सतत वर्दळ असते. तरी सिडकोने काटेरी बाभळींची झाडे काढून टाकावी, अशी मागणी प्रवाशांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
द्रोणागिरी कोस्टल रस्त्यावर काटेरी झुडपे
