पिस्तुल बाळगणारे गजाआड

रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

। अलिबाग । प्रतिनिधी ।

बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणार्‍या व विक्रीला नेणार्‍या दोघांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन पिस्तुलसह काडतूस जप्त केले आहे. रसायनी व खालापूर परिसरात या दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या असून यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात नेरुळ, तुर्भे, दहिसर, नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये हत्यार तस्करी आणि खून केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात एक तरुण बंदूक विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने मंगळवारी (दि.6) सायंकाळी सापळा रचला. मिळालेल्या वर्णनाच्या इसमावर पाळत ठेवण्यात आली. दरम्यान रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक तरुण त्यांना पिल्लई हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर उभा असल्याचे दिसून आले. त्याची हालचाल संशयीत दिसून आली. त्याला एका पोलिसाने विचारणा केली, असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केल्यावर त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतूस सापडले.

निखील जाधव असे या आरोपीचे नाव असून तो मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील असून सध्या रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील रहिवासी आहे. पोलिसी दणका दिल्यावर तो बोलका झाला. मुळचा बिहार राज्यातील आणि सध्या नवी मुंबईत राहणार्‍या मुन्ना दुबे याच्याकडेदेखील पिस्तुल असून खालापूरमध्ये तो बंदूक विक्रीसाठी आल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने खालापूर फाटा येथे सापळा रचला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर छापा टाकून देशी बनावटीचे पिस्तुल व काडतूसह त्याला ताब्यात घेण्यात आले. मुन्ना हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने बंदुकीने तीन खून केल्याचा गुन्हा तुर्भे पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version